Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे सिटी इंजिनियरना जबाबदारीतून हात झटकता येईल का?

सिटी इंजिनियरना जबाबदारीतून हात झटकता येईल का?

Subscribe

काँक्रीटीकरणाची फाईल गहाळ प्रकरण

कल्याण । सिद्धार्थ गायकवाड

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रस्तावाची फाईल गहाळ झाल्यानंतर ती सापडली. या गहाळ प्रकरणात एक शिपाई आणि क्लर्क यांना निलंबित करण्यात आले. तर अन्य अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस प्रशासनाकडून देण्यात आली. आयुक्तांना या फाईली संदर्भात संशय आल्याने रस्ता काँक्रिटीकरण चव्हाट्यावर आले होते. असे असताना सिटी इंजिनियर यांना मात्र याची पुसटशी कल्पना नव्हती का? या प्रकरणात त्यांना जबाबदारी झटकता येईल का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्ते डांबरीकरणाने सुस्थित असताना या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची प्रस्ताव फाईल सिटी इंजिनियर यांच्याकडून अंतिम मंजुरीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे आली होती. मात्र या फाईल संदर्भात आयुक्तांना ठेकेदारी करीत असणार्‍या एका गटाने बर्‍यापैकी ‘कान फुंकल्या’ने फाईल बनविण्यास आग्रह धरणार्‍या त्या ठेकेदाराची या प्रकरणी दमछाक झाली. आयुक्तांपर्यंत फायनल सहीच्या प्रतीक्षेसाठी असलेली फाईल अचानक गायब झाली.

- Advertisement -

कल्याण शहरातील दोन प्रभागातील रस्ते सुस्थितीत असताना सिमेंट काँक्रिटीकरणाची फाईल बनविली जातेच कशी? याबाबत पुरेशी ‘माहिती’ आयुक्तांना देण्यात आल्याने फाईल गहाळ प्रकरणी दोन जणांना सोयीस्कर रित्या निलंबित केले गेले. आयुक्तांना प्रस्तावाच्या फाईल संदर्भात आणि रस्ते सुस्थितीत असताना जर माहिती मिळते, तर सिटी इंजिनियर अर्जुन अहिरे यांच्या निदर्शनास हे का आले नाही? याबाबत दबक्या आवाजात पालिकेत चर्चा सुरू आहे. शहराचा विकास साधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रथम सिटी इंजीनियरशी सल्ला मसलत करीत परवानगी मिळाल्यानंतर प्रस्ताव फाईल तयार केली जाते, ही पद्धत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रूढ झालेली आहे. साडेसात कोटींच्या रस्ता सिमेंट काँक्रिटी करणासाठी नेमकी ही फाईल कुठल्या लोकप्रतिनिधीच्या प्रेशर खाली बनविली गेली आहे? का याची खर्‍या अर्थाने चाचपणी झाली पाहिजे.

प्रस्तावाची फाईल बनविताना सिटी इंजीनियर यांना या फाईल संदर्भात माहिती असेलच, त्याशिवाय साडेसात कोटींची फाईल बनवली जाऊ शकत नाही. त्यामुळे सिटी इंजिनियरला जबाबदारीतून हात झटकता येणार नसल्याचे येथे बोलले जात आहे. या प्रकरणांशी निगडित असलेले नामनिराळे राहिले असून शिपाई आणि क्लर्क यांना मात्र निलंबनाच्या कचाट्यात प्रशासनाने आसमान दाखवले आहे. फाईल प्रस्ताव बनविण्यासंदर्भात सिटी इंजिनियर यांना जबाबदारी झटकता येईल का? याबाबत पालिकेत उलट सुलट चर्चा सुरू आहे. याप्रकरणी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे याबाबत नेमकी कशी कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -