रिक्षा भाडेदर सर्वेक्षण विनाविलंब करा

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र

रिक्षा

मोहने आंबिवली शहरातील रिक्षा स्टॅण्ड आणि शेअर रिक्षा भाडे दर सर्वेक्षण विनाविलंब करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर आणि मोहने आंबिवली विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका, आरटीओ,  वाहतुक पोलीस, पोलीस प्रशासन यांचे मोहने आंबिवली विभागातील वाहतूक व्यवस्था याबाबत दुर्लक्ष होत आहे. मोहने आंबिवली हा परिसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे.  मोहने आंबिवली शहराचे झपाट्याने शहरीकरण आणि नागरीकरण झालेले आहे. त्याच प्रमाणात लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली आहे. हा परिसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असुनही मोहने आंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्था बाबतीत अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. ही बाब खेदजनक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आबिवली मोहने शहरात वाहतुक व्यवस्था नियोजनाकरता आजगायत वाहतूक नियमन आणि उपाययोजना केल्या नाहीत. कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा स्टॅण्ड आणि शेअर रिक्षा भाडे दर निश्चिती सर्वेक्षण करण्यात आले. परंतु मोहने आंबिवली शहरातील प्रवासी आणि रिक्षा आवश्यकता तसेच प्रवासी आणि  रिक्षांची संख्या वाढत आहे. असे असताना रिक्षा स्टॅण्ड आणि शेअर रिक्षा सर्वेक्षण शहराअतंर्गत केले नाही. ही बाब आश्चर्यजनक आहे. त्यामुळे या सर्वेक्षणा बाबत खुलासा  करुन विनाविलंब शहराअतंर्गत रिक्षा स्टॅण्ड आणि शेअर रिक्षा रुट भाडेदर निश्चित सर्वेक्षण करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.