छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा होणार कायापालट – पालकमंत्री एकनाथ शिंदे

धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे अशा विविध अद्ययावत सुविधांनी आता परिपूर्ण होत असून याहून अधिक सुपरस्पेशालिटी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होण्याची गरज आहे. त्याकरता ठाणे महानगरपालिका आणि आपण स्वतः या संपूर्ण रुग्णालयाचा कायापालट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करु, असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. ठाण्याबरोबरच संपूर्ण ठाणे जिल्हयातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात सुपर स्पेशॅलिटी उपचार पध्दती उपलबध व्हावी, यासाठी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून ठाणे महानगरपालिका आणि प्लॅटिनम हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा तसेच क्रीडा आणि समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, आरोग्य परीक्षण आणि वैद्यकीय सहाय्य समिती सभापती निशा पाटील, स्थानिक नगरसेविका अपर्णा साळवी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भीमराव जाधव आणि प्लॅटिनम हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संजित पॉल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका पॉल उपस्थित होते.

धर्मवीर आनंद दिघे हृदय रोग उपचार केंद्रामध्ये १०० बेड्सची योजना असून त्यातील ७० बेड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. ठाणेकरांसाठी विषेशत्: हृदय रुग्णांसाठी ही अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपचार केंद्रात सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या टू डी इको पासून ते ऍन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, स्टेंन्ट टाकणे, या शिवाय बायपास शस्त्रक्रियेसह विविध उपचार हे विनामूल्य केले जाणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत असणार्‍या नागरिकांना हे उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा नाममात्र दरात येथे हृदयासंबंधीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

हेही वाचा –

मुंबईच्या महापौरही म्हणतात ‘या’ तारेखेपासून लोकल सुरू होऊ शकते