बालकल्याण प्रकल्प अधिकारी आत्महत्या प्रकरणात 3 पोलिस अधिकारी यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल

crime

बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या आत्महत्येप्रकरणी नागपूर येथील यशोधरानगर पोलीस ठाण्यातील तीन अधिकार्‍यांसह 6 जणांविरुद्ध अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे. या सहा जणांनी मिळून बालविकास प्रकल्प अधिकारी यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळले होते. त्यानंतर देखील त्यांचा छळ करण्यात येत होता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सचिन साबळे (38) असे आत्महत्या केलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे नाव आहे. सचिन साबळे हे मुंबईतील गोरेगाव येथे बालविकास प्रकल्प अधिकारी होते. अंबरनाथ येथील मोरिवली पाडा येथील अष्टविनायक अँव्हेन्यु या इमारतीमध्ये राहणारे सचिन यांनी 18 फेब्रुवारी रोजी अंबरनाथ येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती. शिवाजी नगर पोलिसांना घटनास्थळी एक काळ्या रंगाची डायरी आणि डायरीत ईमेल केलेले एक पान पोलिसांना सापडले.

पोलिसांना मिळालेल्या काळ्या रंगाच्या डायरी मधील व इमेल मधील मजकुरात सचिनला निता मानकर- खेडकर, ऐश्वर्या खेडकर, दादाराव मानकर यांनी वेळोवेळी फोन कॉल करून त्याने निता खेडकर हिच्याशी लग्न करून नागपूर येथे येऊन रहावे, यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना मानसीक छळ करून ब्लॅकमेलिंग करीत होते. तसेच निता खेडकर हिचे पती निवृत्ती खेडकर यांनी आत्महत्या केल्यानंतर यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या तपासादरम्यान पोलीस उप निरीक्षक दिपक चव्हाण, पोलीस निरीक्षक दुर्गे यांनी 6 डिसेंबर 2020 पासून सचिन यांना गुन्हा दाखल करण्याची भिती घालून वारंवार पैसे उकळले. तसेच पोलीस निरीक्षक मेश्राम यांच्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करून सतत मानसिक तणावामध्ये ठेवत असल्याची नोंद होती.

याप्रकरणी पुण्यात राहणारे सचिन साबळे यांचे मोठे बंधू चंद्रकांत साबळे यांनी बुधवारी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात येऊन निता मानकर- खेडकर, ऐश्वर्या खेडकर व दादाराव मानकर यशोधनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक दिपक चव्हाण, पोलीस निरीक्षक दुर्गे आणि पोलीस निरीक्षक मेश्राम यांच्या विरुद्ध भावाच्या आत्महत्येला हे सहा जण जबाबदार असल्याची तक्रार दाखल केली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी पुराव्याच्या आधारे पोलीस अधिकारी आणि इतर असे एकूण सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, ब्लॅकमेल करून पैसे उकळणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती भोगे यांनी दिली आहे.