उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने दिवाळी पूर्वी शहरातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. उल्हासनगरातील अधिकांश रस्त्यांची चाळण झाल्याने शहरातील विविध भागात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने मिस्ट मशिनद्वारे पाण्याचा फवारा मारण्यास सुरवात केली. परंतु या मिस्ट मशीनचा पुरेसा परिणाम दिसून येत नाही. दरम्यान महापालिका बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्त करण्यासाठी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.
पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती आणि रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी पाच कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याच निधीतून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आली असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच 150 कोटीच्या निधीतून 7 मुख्य रस्ते, मूलभूत सुविधाच्या निधीतून अनेक इतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या रस्त्याच्या कामाने शहरातील 70 ते 80 टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार असल्याचेही माहिती जाधव यांनी दिली.
शहरातील नेताजी चौक, तहसील कार्यालय रस्ता, व्हीनस चौककडे जाणारा रस्ता, पवई चौक आदी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. महापालिका बांधकाम विभाग सक्रिय झाल्याने, दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्ती होणार असल्याने, वाहन चालक, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.