शहरात रस्त्यांची सुरू असलेली कामे युध्द पातळीवर पूर्ण करा

पालिका आयुक्तांचे विविध प्राधिकरणांना निर्देश   

नुसते पावसाळयापुरतेच नव्हे तर कायमस्वरुपी नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी शहरात सुरू असलेल्या रस्ते व अनुषंगिक कामांच्या स्थितीचा आढावा घेत सर्व कामे मे अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले. तसेच शहरातील रस्ते हे विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून त्यांचे मार्फत सुरू असलेली सर्व कामे देखील ३१ मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने कामाची गती वाढवावी व पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला सर्वतोपरी सामोरे जाण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तर पावसाळयात कोणत्याही प्रकारे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व प्राधिकरणांनी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे अशा सूचनाही महापालिका आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या.

ठाणे शहरातील पुर्व द्रुतगती मार्ग, घोडबंदररोड या ठिकाणी मेट्रो ४ आणि ४ ए तसेच मेट्रो ५ अंतर्गत कामे सुरू आहेत, या सर्व ठिकाणी साफसफाई, गटारांची बांधणी, गटारे नाल्याला जोडणे आदी कामे प्राधान्यक्रमाने करावीत. तसेच ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथेच बॅरीगेटींग असेल, अन्य ठिकाणी बॅरीगेटींगची आवश्यकता नसल्यास ते काढण्यात यावे अशा सूचना मेट्रो प्राधिकरणाला दिल्या. जेणेकरुन वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही. कापूरबावडी ते गायमुख रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येत असून या रस्त्याची संपूर्णपणे पाहणी करुन आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्ती करणे, काँक्रिट रस्त्यावरील भेगा भरणे, पेव्हर ब्लॉकच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणे, संपूर्णपणे रस्त्याची साफसफाई व रंगरंगोटी करण्याबाबतच्या कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. तसेच माजिवडा नाका ते आत्माराम पाटील चौकापर्यंतच्या रस्त्यावरील साकेत पुलावरील वाढीव रस्त्याच्या जोडणीचे काम करणे, पुलावरील रस्त्याची कामे मास्टीक अस्फाल्ट पध्दतीने पूर्ण करणे, लेन मार्किंग, कलर्व्हटची कामे व साफसफाई करणे. तसेच मुंब्रा बायपासवर गेल्यावर्षी दरड कोसळ्ण्याचे प्रकार घडले आहेत, या पार्श्वभूमीवर यावर्षी संपूर्ण मुंब्रा बायपासची पाहणी करुन दरड कोसळू नये या दृष्टीने निखळलेले दगड, माती हटविणे, कलव्हर्टचे काँक्रिटीकरण करणे, सांधे भरणे, संलग्न असलेल्या गटारांची कामे आदी बाबत संबंधितांनी युध्दपातळीवर काम करणे. तसेच एमएमआरडीए अंतर्गत असलेल्या मुंब्रा व्हाया कल्याण फाटा पर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजक, स्पीड ब्रेकर, काँर्कीटरोडचे सांधे भरुन साफसफाई व रंगरंगोटीची कामे करणे. त्याचप्रमाणे पूर्वद्रुतगती महामार्गावरील आनंदनगर नाका ते माजिवडा जंक्शन वरील डांबरीकरण रस्त्याची दुरूस्ती करुन उर्वरित कामे करुन कलव्हर्ट व गटारांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या.

त्याचप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या कल्याण फाटा ते महापे रोड हे एमआयडीसीच्या अखत्यारित येत असून संपूर्ण रस्त्यावरील डेब्रीज उचलणे, फूटपाथची दुरूस्ती करणे व काँर्किट रस्त्यावरील सांधे भरुन साफसफाई करणे.  यालगत असलेल्या एमएसआरडीसी अंतर्गत येत असलेल्या कल्याणफाटा ते  रिव्हरवूड रस्त्यावरील पाईप कलव्हर्टच्या ठिकाणी बॉक्सपध्दतीने गटारे बांधणे, साईडपट्टीची कामे करुन साफसफाई व रंगरंगोटी करणे. तसेच नितिन कंपनीजवळील फ्लायओव्हरवरील डांबरीकरण रस्त्याचे आवश्यक ते काम करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
या बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता रामदास शिंदे, विकास ढोले यांच्यासह कार्यकारी अभियंता,  तसेच सार्वजनिक बांधकाम विभागा (शासन), राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मेट्रो प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

” शहरामध्ये महानगरपालिकेव्यतिरिक्त पीडब्‌ल्यूडी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, एमआयडीसी, मेट्रो इ. इतर संस्थांच्या मालकीचेही रस्तेही आहेत. शहरात कुठल्याही रस्त्यावर खड्डा जर पडला तर नागरिकांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो. कोणत्या विभागाच्या अखत्यारित तो रस्ता येतो व त्या रस्त्‍्याच्या स्थितीबद्दल कोणती यंत्रणा जबाबदार आहे या प्रश्नाला नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेता अर्थ राहत नाही. महापालिका व इतर सर्व यंत्रणा यांचे कर्तव्य आहे.

यंत्रणांनी स्वत: प्रयत्न करुन व इतर यंत्रणांशी संवाद ठेवून खड्डेमुक्त रस्ते पावसाळ्यापूर्वी शहरवासियांना उपलब्ध करुन द्यावेत याबाबत मुख्यमंतत्र्यांनी वारंवार सूचना तर दिल्या आहेतच, त्याबरोबर आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला आहे, या पार्श्वभूमीवर यंत्रणांची जबाबदारी अधिक वाढते. तरी सर्व यंत्रणांनी दक्षता घेवून सुरू असलेली कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत आणि कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यादरम्यान रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या.” – अभिजीत बांगर, आयुक्त, ठामपा.