आंबिवली-टिटवाळा रस्त्यावर बांधकामाचे साहित्य

रस्त्याच्या कडेला टाकलेले ग्रीट-माती असे बांधकाम साहित्य आंबिवली-टिटवाळा रस्त्यावर आल्याने येथे वाहनांना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रस्त्याच्या कडेला टाकलेले ग्रीट-माती असे बांधकाम साहित्य आंबिवली-टिटवाळा रस्त्यावर आल्याने येथे वाहनांना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील संभाव्य अपघातात जीवित व वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल, असा सवाल नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील आंबिवली ते टिटवाळा दरम्यान बल्याणी येथील रस्त्यांच्या कडेला गेल्या काही दिवसांपासून एके ठिकाणी माती तर दुसर्‍या ठिकाणी ग्रीट टाकण्यात आले होते. ही माती व ग्रीट आता रस्त्यांवर आली आहेत. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या हा रस्ता या दोन ठिकाणी आणखी अरुंद झाला आहे. दोन्ही दिशांनी वेगाने मोठी वाहने आल्यास रस्त्यावर आलेल्या या माती व ग्रीटमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत एखादा अपघात झाल्यास या संभाव्य अपघाताला जबाबदार कोण महापालिका की पोलीस प्रशासन, असा सवाल नागरिक, वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे आंबिवली-टिटवाळा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी बुजवलेले खड्डे शास्रोक्त पद्धतीने न भरल्याने तेथे उंचवटे निर्माण झाले आहेत. काही बल्याणी प्रभागात आंबिवली ते बल्याणी रस्त्यावर काही ठिकाणी रस्ताच्या बाजूला किंचितही भूभाग नसल्याने येथे मोठ्या वाहनांना एकाचवेळी ये-जा करताना अडथळा उत्पन्न होऊन वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे. याच रस्त्याच्या बाजूला जलवाहिन्यांमधून गळती होत असल्याने रस्ता खचण्याची देखील शक्यता आहे. या पाणी गळतीमुळे खड्डे पडत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासकाकडून दरवर्षी रस्ते सुरक्षा सप्ताह ठिकठिकाणी सुरक्षित प्रवास करण्याचे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. मात्र दर्जेदार रस्ते नसल्याने कल्याण-डोंबिवली शहरात अनेक रस्त्यावरील प्रवास हा अपघाताला निमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे. या सर्व सबंधित विभागांनी दर्जेदार रस्ते सुरक्षित प्रवासासाठी उपलब्ध करून देण्याकडे तातडीने लक्ष पुरवावे, अशी प्रतिक्रिया प्रवासी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाचे माजी सभापती रमेश कोनकर यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आपण सबंधित विभागांना पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती कोनकर यांनी दिली आहे.

हेही वाचा –

Bhandup Dreams Mall Fire: आगीतून बचावलेले २२ कोरोनाबाधित बेपत्ता!