घरठाणेमहापालिकेच्या जागेवर उभारली कंटेनर शाखा

महापालिकेच्या जागेवर उभारली कंटेनर शाखा

Subscribe

आमदार केळकरांनी अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांना विचारला जाब

ठाणे । घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे. हा कंटेनर तत्काळ हटवावा अन्यथा त्या शेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचा भंडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर केला आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचे स्तोम माजल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकांबाबत वारंवार आवाज उठवला आहे. अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. मंगळवारी शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला.

अनधिकृत बांंधकामांवर कारवाईचे आदेश दिले जातात. परंतु निर्ढावलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मूग गिळून बसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठिशी घालणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले होते. ही घोषणा हवेत विरता कामा नये, अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आमदार केळकर यांनी बजावले.

- Advertisement -

धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचेही आमदार केळकर यांनी सचित्र दाखवले. 2021 साली याच जागेवर कपाऊंड टाकून लोकोपयोगी मुलभूत सोईसुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती. महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही 24 जानेवरी रोजी याठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवून 27 जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आयुक्तांनी तत्काळ फोन करून कारवाईचे आदेश दिल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. दरम्यान, राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी ? तेव्हा, तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा याच ठिकाणी दोन प्रतिकात्मक कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -