मुरबाड तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये जनसुरक्षा योजनेअंतर्गत स्मशानभूमींची कामे करण्यात आली आहेत. मात्र केलेल्या कामांची बिले अदा करण्यात आली नाहीत. म्हणून ठेकेदार मंडळीचा रागाचा पारा चढला असून, जोपर्यंत आम्ही केलेल्या कामांचे पैसे मिळत नाहीत. तोपर्यंत या नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभुमीत मृतदेह जाळू नयेत अथवा अंत्यसंस्कार करू नयेत असा सूर आळवल्याने ग्रामीण भागात मृतदेहांची हेळसांड होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात ठेकेदारांनी सुसज्ज अशा स्मशानभूमींची कामे केली असली तरी त्या कामाचे देयक मिळत नाही तोपर्यंत तेथे अंत्यसंस्कार करायचे नाही. अशी कठोर भुमिका ठेकेदारांनी घेतल्याने मृतदेहांची हेळसांड होत असल्याने शासनाचे कार्यक्षमतेवर सर्वत्र नाराजी पसरली आहे.
ग्रामीण भागात स्मशानभूमी अभावी उघड्यावर होणारे अंत्यसंस्कार आणि मोडकळीस आलेल्या स्मशानभूमींची दुरावस्था पाहून शासनाने जनसुविधा योजनेअंतर्गत सन 2020-21 मध्ये कोट्यवधी रुपये स्मशानभूमींची कामे करण्यासाठी जाहीर केले असताना ठेकेदारांनी त्या स्मशानभूमीचे काम कर्जबाजारी होऊन पुर्ण केले. परंतु त्या कामाचे देयक सहा महिने होऊनही मिळत नसल्यामुळे सुसज्ज अशा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी ठेकेदार विरोध करत असल्याने मृतदेहावर उघड्यावर केले जात आहेत. त्यामुळे मृतदेहांची हेळसांड होत असल्याने ठेकेदार व ग्रामस्थ यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.शासनाला जर या बांधकामाचा निधी द्यायचा नाही तर ही बांधकामे करायला लावलीच कशाला हा प्रति प्रश्न विचारला जात असुन कोट्यवधी रुपयांच्या जन सुविधेच्या या योजनांचा फायदा नागरिकांना होत नसल्याने शासनाने सर्वसामान्य नागरिकांना जीवंतपणी छळले असले तरी मरतानाही त्यातुन सुटका केली नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
” या कामांना सन 2020-21 मध्ये मंजुरी असताना ठेकेदाराने मुदतीत ती कामे पूर्ण केली नसल्याने त्या कामांना नव्याने प्रशासकीय मुदतवाढ मिळाल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील.
– मनुज जिंदाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे