कोरोना उपायांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई महानगर प्रदेशात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  जिल्हा आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध विभागांच्या प्रमुखांची ऑनलाईन बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घेतली. स्वतः शिंदे रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतानाच जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या या कृतीमुळे जिल्हा प्रशासनाचे मनोबल उंचावल्याची भावना अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मंत्री शिंदे यांनी ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेशातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, आरोग्य, नगरपरिषदा यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासकीय तयारीची माहिती घेतली.

सर्व यंत्रणेने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रभावीपणे सामना केला त्याबद्दल पालकमंत्र्यांनी यंत्रणांचे अभिनंदन केले. फिल्ड हॉस्पिटलची उभारणी, त्याला लागणारे मनुष्यबळ, औषधांची, ऑक्सिजनची उपलब्धता याविषयी पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हा, महापालिका निहाय आढावा घेतला. स्वतःवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाही रुग्णालयातील वॉर्ड म्हणून शिंदे जिल्हा यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधताहेत ही कृती अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावणारी असल्याची भावना कल्याण डोंबिवलीचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. यावेळी नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर या महापालिका आयुक्तांनी यंत्रणा सज्जतेची माहिती दिली.

ठाणे जिल्ह्याची सज्जता
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील तयारी बाबत माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्यात सुमारे १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धतेची व्यवस्था करण्यात आली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनसाठी तयार करण्यात आलेले सर्व टॅंकमध्ये ऑक्सिजन भरून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, बदलापूर सर्व कोविड केअर सेंटर्स (सीसीसी) कार्यन्वित झाले असून भिवंडी जवळील सवाद रुग्णालयात १०० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण १० टक्के
ठाणे शहर आणि जिल्ह्यातील महापालिका व ग्रामीण भागात  सध्या दिवसाला ७ ते ८ हजार रुग्ण आढळून येत आहेत मात्र त्यापैकी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण १० टक्के आणि ऑक्सिजन वापराचे प्रमाण ४ टक्के असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

ऑक्सिजन तिपटीने उपलब्ध
जिल्ह्यात इयत्ता नववी पर्यंत आणि अकरावीचे वर्ग ऑनलाईन सुरू असून आश्रमशाळा बंद करण्यात आल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एका दिवसाची सर्वोच्च रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्याला लागणारा ऑक्सिजनच्या तिप्पट ऑक्सिजनची उपलब्धता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.