हुक्कापार्लरच्या नावाखाली नशेचा ‘चस्का’, नेत्यांच्या तरूण मुलांचा रॉयल कारभार

कल्याणमधील हुक्कापार्लरवर गुन्हे शाखेच्या पोलिसानी शुक्रवारी रात्री छापा टाकून नशेत झिंगनाऱ्या शंभर जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमध्ये उच्चभ्रू घरातील तरुण तरुणी आणि स्थानिक नेत्याच्या मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हुक्कापार्लर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime Branch police raid hookah parlor in Kalyan
हुक्कापार्लरच्या नावाखाली नशेचा 'चस्का', नेत्यांच्या तरूण मुलांचा रॉयल कारभार

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री अकरा ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान कल्याण मधील खडकपाडा पोलिसांच्या नाकावर ठिच्चून पहाटेपर्यंत हुक्का पार्लर, तसेच बियर बार सुरू सुरू ठेवले जात असल्याचे समोर आहे. कल्याणमधील हुक्कापार्लरवर गुन्हे शाखेच्या पोलिसानी शुक्रवारी रात्री छापा टाकून नशेत झिंगनाऱ्या शंभर जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमध्ये उच्चभ्रू घरातील तरुण तरुणी आणि स्थानिक नेत्याच्या मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हुक्कापार्लर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुक्का पार्लरचे मॅनेजर आणि इतर कर्मचारी यांना अटक करून इतरांना नोटीस देण्यात आल्याची पोलिसांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी २१ डिसेंबर रोजी आदेशात काढण्यात आला. या आदेशामध्ये ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १४४ कलमानुसार संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचे सर्वत्र पालन होत असताना मात्र खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत होते. कल्याण पश्चिमेकडील गांधारी या उच्चभ्रू वसाहतीत असणारा ‘चस्का कॅफे’ या ठिकाणी बेकायदेशीररित्या रात्री ११ नंतर हुक्कापार्लरच्या नावाखाली नशेचा बाजार भरवला जात होता.

ठाणे गुन्हे शाखा घटक ३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाला माहिती मिळताच शुक्रवारी रात्री चस्का कॅफे या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कॅफेत तरुण तरुणी नशेत झिंगत असल्याचे दिसून आले. पोलिसांचा छापा पडल्याचे कळताच अनेकांनी मिळेल त्या वाटेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना वेळीच ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई सुरू केली. छाप्याच्या ठिकाणाहून पोलिसांना मोठ्या प्रमाणात हुक्का, फ्लेवर, विशिष्ट प्रकारची सुगंधी तंबाखू आणि इतर नशेच्या वस्तू मिळाल्या आहेत.

पार्लरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये उच्चभ्रू तरुण तरुणी आणि स्थानिक नेत्याची मुले होती. त्यांच्यापैकी ८० जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. याप्रकरणी हुक्कापार्लर मालक, व्यवस्थापकआणि कर्मचारी असे एकूण ८ ते १० जणांवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी त्यांना खडकपाडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.


हेही वाचा – बोरांच्या वाटणीवरुन मजूर दाम्पत्याच्या चिमुकल्याची केली हत्या