सध्याचे राजकारण लोकशाहीला धोकादायक – माजी आमदार रुपेश म्हात्रे

कल्याण पश्चिमेत झाला शिवगर्जना मेळावा

  युद्धाला सुरवात करतांना शिवगर्जना केली जाते त्यामुळे शिवगर्जना मेळावा हि युद्धाची सुरवात असून याची सुरवात उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सध्याचे राजकारण लोकशाहीला घातक असून हुकुमशाहीला सुरवात होत असतांना याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी सांगितले. भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये आज शिवगर्जना मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रुपेश म्हात्रे बोलत होते. यावेळी उपनेते अल्ताफ शेख, जिल्हासंपर्क प्रमुख विजय साळवी, युवती सेनेच्या शीतल देवरूखकर – सेठ, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे, कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील,  विधानसभा क्षेत्र संघटक रविंद्र कपोते, मुंबईच्या विभाग संघटक राजुल पटेल, जेष्ठ सल्लागार बाळ हरदास यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्या पद्धतीने आज राजकारण केलं जातय त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये भाजपविषयी प्रचंड चीड तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. ज्यामुळे भाजपच्या उरामध्ये धडकी भरली असल्यानेच ते निवडणूक घेण्याची हिंमत करत नसल्याची टीका देखील म्हात्रे यांनी केली. कसबा विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र त्याठिकाणी आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेने निवडून दिले आहे. ही भविष्यातील राजकारणाची नांदी असल्याचे मतही संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केले.
तर भाजप पक्ष हा पुतना मावशी असून ज्यांच्यासाठी आपण इतके इमाने इतबारे काम केले त्यांनीच आपल्याला संपवण्याचा प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडले मग काश्मिरात मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत जाऊन तुम्ही काय केले? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी उपनेते अल्ताफ शेख, जिल्हासंपर्क प्रमुख विजय साळवी, युवती सेनेच्या शीतल देवरूखकर – सेठ, विधानसभा क्षेत्र संघटक रविंद्र कपोते यांच्यासह दिलीप मालवणकर, तुषार राजे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आगामी काळात खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.