Cyclone Tauktae:ठाण्यात २४ तासातच १८८ मिमी पावसाची नोंद

वृक्ष पडल्याच्या घटनांमध्ये अनेक गाड्यांसह चार घरांचे नुकसान झाले आहेत. त्यातच मुंब्रा येथील देसाई खाडी येथे लोखंडी जाहिरात फलक टेम्पोवर पडला

तौक्ते चक्रीवादळामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर वारा आणि पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. चोवीस तासात ठाण्यात १८८ मिमी पावसाची नोंद झाली असून ६० हून अधिक ठिकाणी लहान-मोठी वृक्ष उन्मळून पडली. वृक्ष पडल्याच्या घटनांमध्ये अनेक गाड्यांसह चार घरांचे नुकसान झाले आहेत. त्यातच मुंब्रा येथील देसाई खाडी येथे लोखंडी जाहिरात फलक टेम्पोवर पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तर दोघे जखमी झाले आहेत.
तर शहरातील नौपाडा परिसरात एका कार झाडे पडले त्यामध्ये कारमधील चालक हा जखमी झाला आहे. तसेच शहाड येथील स्टेम प्राधिकरण येथे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा सकाळच्या सत्रात परिमाण झाल्याचे दिसून आले.

तौक्ते चक्रीवादळामुळे त्याचबरोबर दोन ठिकाणी इमारतींचा काही भाग कोसळला असून तीन झाडे धोकादायक झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. तौक्ते चक्रीवादळामुळे रविवारी मध्यरात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला देखील सुरुवात झाली. रात्रीपासून सोमवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. ठाणे शहरातील सखल भाग असलेल्या तीन ठिकाणी तुरळक प्रमाण पाणी साचण्याची घटना घडली. तर, जवळपास ६० हुन अधिक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या आहे. ही झाडे गाड्यांवर आणि घरांवर पडलेल्या त्यांचे नुकसान झाले आहे.

कारवर कोसळले झाड, सुदैवाने चालक बचावला
सोमवारी सांयकाळी नौपाडा पोलीस स्टेशन जवळ एका कारवर वृक्ष कोसळला. अचानक वृक्ष कारवर पडल्याने कारमधील डाॅक्टर रितेश गायकवाड हे देखील त्या कारमध्ये अडकून पडले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच ठामपा आपत्ती व्यवस्थापन आणि टीडीआरएफ, अग्निशमन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना कारमधून बाहेर काढले. यात त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

फलकामुळे दोघे जखमी
मुंब्रा हद्दीमध्ये डोंबिवलीकडून कल्याणफाटा कडे जाणारे वाहिनीवरील देसाई खाडी पुलाजवळील लोखंडी जाहिरात फलक टेम्पोवर पडल्याने टेम्पो चालकासह त्याचा मदतनीस जखमी झाले. कळवा, विटावा येथील सचिन शांताराम चव्हाण, (३५) व बन चिमण चौधरी (४५) या जखमींना सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, बीट मार्शल अंमलदार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल स्वामी यांनी शिताफीने गाडीचे बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने लोखंडी जाहिरात फलक आणि अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला घेऊन तात्काळ वाहतूक सुरळीत केली.

ठाण्यात लसीकरण बंद
जोरदार वाऱ्यासह पाऊसामुळे शहरात सोमवारी लसीकरण केंद्र बंद ठेवले होते. चक्रीवादळाची संभाव्य भीती लक्षात घेऊन लसीकरण ठेवल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

तक्रारींचा पाऊस
चक्रीवादळामुळे ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज होती. त्यातच, रविवारी रात्री पासून सुरू झालेल्या पाऊसामुळे शहरात वृक्ष उन्मळून पडल्याचे सत्र सुरू झाले. त्यामुळे आपत्ती कक्षेचा फोन सातत्याने खणखणत होता. साहेब झाडे पडले, तर कुठे फांदी पडली, पाणी साचले, इमारतीचा भाग कोसळला अशा जवळपास १०० हुन अधिक तक्रारींचा मार सुरू होता. या वादळाने क्षणभर ही बसायला वेळ मिळाला नाही. अशा काही मिनिटांना येणाऱ्या तक्रारींमुळे ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती कक्षाच्या कर्मचाऱ्यांची चांगली धावपळ उडाली.

उल्हासनगरात रिक्षावर झाड कोसळून एकाच मृत्यू
उल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी आहेत. कॅम्प ५ च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना झाली आहे. या ठिकाणाहून एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक भलेमोठे झाड उन्मळून या रिक्षावर पडले. त्यामुळे रिक्षातील प्रवासी यात गंभीर जखमी होऊन त्यातील लखुमल कामदार या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक रवींद्र मोरे आणि अन्य एक प्रवासी त्यामध्ये गंभीर जखमी आहे. हे झाड वीजेच्या तारांवर देखील कोसळल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अग्निशमन दलाकडून हे झाड बाजूला करण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले असून जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. याच प्रमाणे उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या विजेचे खांब वाकणे तसेच विजेच्या तारा देखील तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अनेक इमारतीवरील पत्रे देखील उडून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले.

टिटवाळ्यात वाताहात
वादळ आणि पावसाळामुळे टिटवाळासह लगतच्या ग्रामीण भागातील ७० गावपाड्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडणे, घराचे छप्पर उडण्याच्या घटना घडल्या आहेत. टिटवाळा येथील रेल्वे स्टेशन ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर मराठे फाॅच्युन सोसायटीत समोर आणि युवराज पॅलेस या लाॅज लगत दोन मोठी झाडे दुपारी एकच्या सुमारास उन्मळून पडली आहेत. यामुळे या रस्त्यावरील रहदारी बंद झाली. या शिवाय हरी ओम व्हॅली सोसायटीच्या रस्त्यावर झाड कोसळले. झाडे कोसळल्यामुळे वीज वितरण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले सोमवारी रात्रीपर्यंत अनेक भागात विजेअभावी अंधार होता.

तसेच वीज वितरण कंपनीच्या खडवली फिडरच्या उच्च दाबाच्या वाहिनीवर गोवेली काॅलेजजवळ झाड कोसळले. तसेच कांब आणि मांजार्ली या ठिकाणी उच्च दाबाचे वीजखांब कोसळले. त्यामुळे एलटी लाईन भागातही वीज पुरवठा खंडीत झाला. वीज वितरण विभागाच्या कामगारांनी सातत्याने वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती उप कार्यकारी अभियंता धिरजकुमार धुवे यांनी दिली. कल्याण ग्रामीण भागात वुक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असुन सुदैवाने कुठल्याही प्रकाराची जीवीत हानीची घटना नाही. अपत्ती व्यवस्थापन पथक तत्पर असुन रस्ते वाहतूक सुरळीत आहे. वीज पुरवठा खंडित अखंडित सुरू असल्याचे तहसीलदार दिपक आडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.

भिवंडीत सुदैवाने कुटुंब बचावले
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मोठ्या प्रमाणात वादळ आणि पावसाने धुमाकूळ घालत सकाळी त्याची तीव्रता वाढल्याने ठिकठिकाणी झाडे कोसळले तर विजेचे शेकडो खांब पडले. तर शेलार येथे एक घर पूर्ण कोसळले परंतु सुदैवाने त्यातील कुटुंब बचावले. अंजुरफाटा,नारपोली , कल्याण रोड, अशोक नगर , बाळा कंपाउंड , आदी भागात अतिवृष्टी व वाऱ्यामुळे २० झाडे पडली. तर वादळाचा सर्वात मोठा भिवंडी ग्रामीण भागाला पडला.शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मिठपाडा येथे राजकुमार प्रजापती यांचे सकाळी बैठे घर पूर्णपणे कोसळले यात त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुले अडकून पडले होते पण स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. यात घराचे पूर्णपणे नुकसान झाले.

ग्रामीण भागातील अंबाडी,वज्रेश्वरी, दाभाड,पडघा आदी ठिकाणी शेकडो झाडे उन्मळून पडली तर अंबाडी आणि गणेशपुरी विभागात वीजचे सुमारे ७० ते ८० खांब पडले. यामुळे ग्रामीण भाग पूर्णपणे अंधारात गेला आणि वीज वितरण कंपनीचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. धामणकर नाका अंजुरफाटा मार्गावर असलेल्या पारसिक बॅंक समोर भला मोठा झाड पडल्याची घटना घडली आहे. हा झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दल दाखल होत कटर च्या साहाय्याने झाड कापून बाजूला करण्यात आले. तर बाळा कंपाउंड येथे देखील मोठे झाड पडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत देखील कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र हे झाड थेट या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षा वर पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले.