झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान

वसंतविहार, लोकपुरम कॉम्प्लेक्स येथील घटना

शहरात सध्या झाड उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्या असताना, कळवा आणि वसंत विहार घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोसळलेल्या झाडांमुळे 4 चारचाकी गाड्यांसह एक दुचाकीचे नुकसान झाले आहे. यामध्ये दुचाकी ही पोलिसांनी जप्त केलेली आहे. तसेच ती पडलेली झाडे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केली.

वसंतविहार, लोकपुरम कॉम्प्लेक्स येथे पार्क केलेल्या दोन चारचाकी वाहनांवरती बुधवारी रात्री झाड पडले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास विताव कळवा शहर वाहतूक ऑफीस बाजूला, रस्त्यावरती पार्क केलेल्या दोन चार चाकी वाहनांवरती व कळवा वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या (जुन्या भंगार) दुचाकी वरती चिंचेचे मोठे झाड पडले. या घटनेत ही कोणालाही दुखापत झालेली नाही. तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनांची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेत ती झाडे कापून एका बाजूला केलेली आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

घराच्या भिंतीचा काही भाग पडून महिला जखमी
मुंब्रा रशिद कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली घराच्या भिंतीचा काही भाग पडल्याची घटना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत तब्बासुम जलील सय्यद ही 50 वर्षीय महिला किरकोळ जखमी झाली. त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मुंब्रा,रशिद कंपाउंड, येथे रशिद मुल्हा चाळ मधील चाळ क्रमांक एकमधील खोली क्रमांक 7 या घराच्या भिंतीचा काही भाग पडला. या घटनेत त्या घराची 50 वर्षीय मालकीण महिला जखमी झाली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळाली,त्यानुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून तब्बासुम सय्यद ही महीला किरकोळ जखमी झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.