घरठाणेबदलापुरात वणवे सुरूच

बदलापुरात वणवे सुरूच

Subscribe

टाहुली डोंगराच्या आगीत वनसंपदेची हानी

गेल्या सात दिवसांपासून बदलापूर जवळच्या डोंगरावर वणव्याचे सत्र सुरूच आहे. त्यातच गुरुवारी दुपारनंतर लागलेल्या भीषण वणव्यामुळे टाहुली डोंगरावरील मोठा भाग भस्मसात झाला आहे. या डोंगराच्या विविध सहा भागात गुरुवारी आग पहायला मिळाली. ही आग इतकी मोठी होती की थेट अंबरनाथ आणि सात ते आठ किलोमीटरवरून याची दाहकता पहायला मिळत होती. त्यामुळे वनसंपदेची मोठी हानी झाली असून वन विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या टाहुली, हाजीमलंग डोंगर परिसरात गेल्या काही दिवसात वणव्याचे सत्र सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील एक संपन्न जंगल म्हणून या डोंगररांगांची ओळख आहे. गेल्या काही वर्षात येथे निसर्गसंपन्नता टिकल्याने विविध पक्षी, प्राण्यांचा वावर या भागात वाढला होता. बदलापूर आणि आसपासच्या डोंगर भागात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचेही गेल्या काही वर्षात स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्राणीसंपदेमुळे संवेदनशील जंगल म्हणून बदलापुरच्या या डोंगराला पाहिले जाते आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या डोंगरावर आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात सर्वप्रथम गुरुवारी चिखलोली येथील डोंगराच्या भागाला आग लागली होती. त्यावेळी सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी पुढे येत वन विभागाला ही आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले होते. त्यामुळे अवघ्या काही तासात आग आटोक्यात आणण्यात वन विभागाला यश आले. मात्र त्या दिवसापासून बदलापूरच्या या डोंगराला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे.

दररोज कोणत्या न कोणत्या भागात आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. गुरुवारी या आगीने रौद्र रूप धारण केले होते. दुपारनंतर ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. बदलापूर पूर्वेतील शिरगाव, कात्रप, चिखलोली, टाहुली डोंगराचा उत्तरेकडील भाग आणि डोंगराच्या टोकावर दोन ठिकाणी अशा तब्बल सहा ठिकाणी एकाच वेळी आग लागली होती. या आगीची दाहकता इतकी होती की शहराच्या सात ते आठ किलोमीटरवरूनही आगीच्या ज्वाळा पहायला मिळत होत्या. या आगीत मोठी वनसंपदा जळून खाक झाल्याची भीती व्यक्त होते आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -