ठाण्यात धोकादायक घरांचे संकट कायम; एकूण ४५२२ धोकादायक इमारतींना नोटीस

पावसाळा तोंडावर असताना या इमारतींच्या दुरुस्तीचे काम जर केले नाही तर इमारती कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

Dangerous housing crisis persists in Thane; Notice to 4522 dangerous buildings
ठाण्यात धोकादायक घरांचे संकट कायम; एकूण ४५२२ धोकादायक इमारतींना नोटीस

दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींचे संकट यंदाही ठाणेकरांच्या डोक्यावर आहे. ठाणे शहरात प्रामुख्याने ४ हजार ५२२ इमारती या धोकादायक घोषित केलेल्या आहेत. त्यांना नोटीस दिल्यानंतर त्यामधील काही इमारतींमध्ये दुरुस्ती झाली असून काही इमारतींची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. पावसाळा तोंडावर असताना या इमारतींच्या दुरुस्तीचे काम जर केले नाही तर इमारती कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात ठाण्यात इमारती कोसळून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील धोकादायक असलेल्यांपैकी एका इमारतीत जवळपास ४० ते ५० कुटुंबे राहत आहेत. या सर्व कुटुंबांवर भीतीचे सावट आहे. ठाण्यातील प्रामुख्याने तीन ठिकाणी क्लस्टर योजना होणार असल्याचे सांगितले गेले आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या क्लस्टर योजनेचा नारळ फोडला गेला. परंतु आजतागायत या योजनेला पुरेसा वेग मिळालेला नाही. पावसाळ्यादरम्यान अनेकदा जुन्या इमारती पडण्याच्या घटना घडून जिवितहानी होते.

ठाण्यातील अनेक धोकादायक इमारतींमध्ये नाईलाजाने कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि ज्यांचे हातावर पोट आहे असे कामगार राहात आहेत. नवे पक्के घर घेणे परवड नसल्याने या ठिकाणीच रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. जोरदार पाऊस झाल्यानंतर काही दुर्घटना घडतात. त्यानंतरच प्रशासन जागे होते, प्रशासकीय अधिकारी हे मोठ्या बंगल्यात राहत असून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दुःख वेदना तसेच भीती अधिकार्‍यांना कळणार नाही, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते आणि इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोना संकट असल्याने अनेकांचे व्यवसाय बंद पडले, काहीजणांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे इमारतीची डागडुजी आणि इतर खर्च परवडण्यासारखी रहिवाशांची स्थिती नाही. अशातच महापालिका प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्यास दुर्घटना घडण्याची भीती आहे.

पावसाळा जवळ आला आहे. अनेक पावसाळे येवून गेले, रहिवाशांना सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला हक्काचे घर द्यावे. इमारतीमध्ये राहणे धोक्याचे आहे. भितीदेखील वाटते पण नाईलाज असल्याने रहाव लागत आहे. सरकारने लवकर पावले उचलावीत. आम्हाला हक्काचे घर मिळाले पाहिजे.
– किसन नगरमधील धोकादायक इमारतीतील रहिवासी

धोकादाक इमारतीमध्ये तीन प्रकार असतात. त्यातील सी १ प्रकाराची इमारत अतिशय धोकादायक असते. ती अगोदर तोडली जाते. दुसऱ्या प्रकारात सी-२ ए या विभागातील इमारतींना त्या रिकाम्या करुन दुरुस्तीची परवानगी देण्यात येते. सी २ बी विभागातील इमारतीत राहतानाही त्या दुरुस्त करण्याची परवानगी दिली जाते. स्ट्रकचरल स्टॅबिलिटी सर्टीफीकेट दिल्यानंतर त्याची सत्यता तपासली जाते. त्यात ती राहण्यायोग्य असेल तर रहिवाशांना राहण्यासाठी परवानगी दिली जाते. ज्या इमारती राहण्यास योग्य नाहीत त्या इमारती खाली करुन तोडण्यात येतील.
– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका