तानसा मार्गावरील धोकादायक पुलावरून हजारो प्रवाशांची ये-जा; शहापुरातील २५ गावांचा प्रवास धोकादायक

या रस्त्यावरुन दोन वाहने समोरा समोर आल्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच या मार्गावरील मोहीली भावसे गावाजवळील झिरो फोर तसेच टहारपुर गावाजवळील पुलांची अवस्था अंत्यत दयनीय झाली असून या पुलांचे बांधकाम जीर्ण झालेले आहे.

तानसा मार्गावरील धोकादायक पुलावरून हजारो प्रवाशांची ये-जा; शहापुरातील २५ गावांचा प्रवास धोकादायक
Dangerous journey of thousands of passengers in the vicinity of Tansa Dam in Shahapur

शहापुरातील तानसा-अघई मार्गावरील टहारपूर व भावसे हे दोन्ही पुल धोकादायक ठरवण्यात आले आहेत. मात्र प्रवासकरिता पर्यायी व्यवस्थाच नसल्याने परिसरतील २५ गावसह अनेक पाड्यांवरील गावकर्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन नवीन पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धोकादायक पुलांवर प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.तानसा जलाशयातून मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो.

या धरणाकडे जाणारा मार्ग वळणा वळणाचा व अरुंद आहे.या रस्त्यावरुन दोन वाहने समोरा समोर आल्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच या मार्गावरील मोहीली भावसे गावाजवळील झिरो फोर तसेच टहारपुर गावाजवळील पुलांची अवस्था अंत्यत दयनीय झाली असून या पुलांचे बांधकाम जीर्ण झालेले आहे.  दुरुस्ती अभावी या पुलांची पडझड झाल्याचे दिसत आहे.पुलाचे संरक्षक लोखंडी रेलींग पाईप संपूर्ण तुटलेले आहेत. त्यामुळे वाहन चालवितांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना ये जा करावी लागते. विशेष म्हणजे दोन्ही पुलांचे स्टक्चरल ऑडीट झाले असून दोन्ही पुल धोकादायक म्हणून प्रशासनाने घोषित केलेले आहेत. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने 25 गाव पाड्यातील नागरिकांना येथून प्रवास करावा लागत आहे.

मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार

भावसे व टहारपूर या अरुंद आणि धोकादायक पुलाच्या समस्येबाबत मी यापूर्वीच अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारुन सभागृहाचे याकडे लक्ष वेधले होते. वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झालेल्या या दोन्ही पुलांची कामे मुंबई महापालिकेने तात्काळ करावीत अशी मागणी केली आहे. या संदर्भातील मुंबई पालिकेशी पत्रव्यवहार सुरू आहे, असे आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले. तर भावसे येथील ग्रामस्थ रोहीदास गोदडे यांनी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल केला असून तात्काळ नवीन पूलचे काम हाती घ्यावे अशी मागणी केली.