घर ठाणे दर्याच्या राजाने पारंपरिक पद्धतीने साजरी केली नारळी पौर्णिमा

दर्याच्या राजाने पारंपरिक पद्धतीने साजरी केली नारळी पौर्णिमा

Subscribe

मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने पद्धतीने दर्याला नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमेचा सण मोठया जल्लोषात साजरा केला. ठाणे पूर्व भागात चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कोळीवाड्यातील तिघा नवदाम्पत्याने विधिवत पूजा करत  दर्याला नारळ अर्पण करत सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी आवाहन केले. नारळीपौर्णिमेचे औचित्य साधून चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या वतीने पूर्व – पश्चिम कोळीवाड्यातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. पूर्व भागातील विठ्ठल मंदिरात कौत्यय आणि रेश्मा कोळी, कुणाल आणि माधवी कोळी, सम्राट आणि तन्वी कोळी या नवदाम्पत्याच्या हस्ते नारळाची पूजा करण्यात आली. त्यानंतर पश्चिम कोळीवाड्यातील दत्तमंदिरातून ही मिरवणूक वाजत गाजत पूर्व भागातील चेंदणी बंदर येथे आली. त्याठिकाणी दर्याला शांत होण्याचे आवाहन करत त्याला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक विक्रांत कोळी म्हणाले,  नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा मोठा सण आहे. पूर्वीपासून चेंदणी कोळीवाड्यात हा सण उत्साहात साजरा होतोय.  मधल्या काही काळानंतर चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच च्या वतीने गेल्या २४ वर्षाहून अधिक काळ हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करत समाजाची परंपरा जोपासली जातेय. यावेळी हजारो कोळी बांधव , भगिनी पारंपरिक वेशभूषेत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ठामपाकडून ही मानाच्या नारळाचे पूजन
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधवांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीचे स्मरण  करून व मानाच्या नारळाची पूजा करून  वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर कळवा खाडी येथे मानाचा नारळ कोळी बांधवांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते.

नारळी पौर्णिमेनिमित्त कल्याण पूर्वेतील नांदीवलीमध्ये मिरवणूक
 कल्याण पूर्वतील नांदीवली कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमेचा उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. नारळी पौर्णिमेनिमित्त  माजी सरपंच रामदास ढोणे यांच्या वतीने  नांदीवलीतील गावदेवी मंदिरापासून बोटीची प्रतिकृती आणि त्यात मोठा नारळ ठेवत या मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. संपूर्ण गावात वाजत गाजत ही मिरवणूक नांदीवली तलावापर्यंत  भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत बॅन्ड, ढोल, ताशाच्या गजरात व कोळीगीतांच्या तालावर कोळी बंधु, भगिनी, आबालवृध्द नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते. नांदीवली तलावावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची  विधिवत पूजा करून  नारळ अर्पण करण्यात आला असून मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना भरपूर मासे मिळून त्यांच्या सुरक्षितेतेची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शेतकरी बळीराजासाठी  वरुणदेवाकडे साकडे घालत भरपूर पाऊस पडावा अशी प्रार्थना केली असल्याची माहिती नांदीवलीचे माजी सरपंच रामदास ढोणे यांनी दिली.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -