घरठाणेठाणे शहरात रिक्षाचालकांसाठी तात्पुरते निवारे उभारण्याची मागणी

ठाणे शहरात रिक्षाचालकांसाठी तात्पुरते निवारे उभारण्याची मागणी

Subscribe

शिवसेनेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांची आयुक्तांना विनंती

ठाणे शहरातील रिक्षाचालक बंधू-भगिनींना दिवसभरातील काही वेळ विश्रांती घेण्यासाठी शहरातील काही ठिकाणी तात्पुरते निवारे उभारावेत, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका व विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषा प्रताप सरनाईक यांनी आयुक्त डॉ. अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी अधिकृत रिक्षा थांबे निश्चित करावेत, अशी विनंतीही केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ६० हजारांहून अधिक रिक्षाचालक बंधू-भगिनी आहेत. काही रिक्षाचालक दिवसभरातील १६ ते १८ तास कार्यरत असतात. रिक्षाचालक बंधू-भगिनींना मधल्या वेळेत १५-२० मिनिटांची विश्रांती गरजेची असते. मात्र, दुर्देवाने ठाणे शहरात रिक्षाचालकांना बसण्यासाठी पाच मिनिटेही हक्काची जागा उपलब्ध होत नाही. विश्रांतीसाठी जागा नसल्यामुळे महिला व पुरुष रिक्षाचालकांचे हाल होतात. कडक ऊन व मुसळधार पावसाच्या काळात हालांना पारावार राहत नाही. त्यादृष्टीने तीन वर्षांपूर्वी विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिवाईनगर येथे हक्काचा निवारा उभारण्यात आला होता. नुकतेच या निवाऱ्याचे नुतनीकरण करून उद्घाटनही करण्यात आले. त्याच धर्तीवर रिक्षाचालकांसाठी निवारा उभारण्यासाठी चार वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत, याकडे माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. या सुशोभिकरणातून शहरातील हजारो रिक्षाचालकांसाठी तात्पुरते निवारे उभारता येतील. काही महत्वाच्या रस्त्यांवर स्वच्छतागृहे उभारून जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. या स्वच्छतागृहांवर जागा उपलब्ध आहे. या ठिकाणीही रिक्षाचालकांसाठी निवारा उपलब्ध होऊ शकेल, अशी सूचना माजी नगरसेविका सरनाईक यांनी केली आहे. ठाण्यातील रिक्षाचालकांसाठी महापालिकेकडून अधिकृत थांबे निश्चित केले जातात. परंतु, अनेक ठिकाणी अद्यापि अधिकृत थांबे निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे अनेक वेळा रिक्षाचालकांना पोलिसांकडून दंड आकारला जातो. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांच्या संघटनांबरोबर समन्वय साधून रिक्षाथांबे निश्चित करावेत, असे परिषा सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -