विधानपरिषदेतच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी चौकशी ही निःपक्षपातीपणे व्हावी येवढीच इच्छा आहे. तसेच ही घटना अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. राज्य सरकारने सर्व रुग्णालयाला जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात हीच माझी सरकारकडून अपेक्षा असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर बराचशा रुग्णालयात सीसीटीव्ही लावलेले असतात, मात्र त्यांचे निरीक्षण आरोग्य व्यवस्थेने करणे गरजेचे आहे. रुग्णालयात औषधांचा साठा पुरेसा नसल्याने काही वाईट परिणाम झाला आहे की नाही, ते समजून घेणे महत्वाचे आहे. परंतु हे सर्व समितीच्या अहवालात दिसेल असेही त्यांनी यावेळी म्हटले. याशिवाय ज्या डॉक्टरांनी आणि येथील कर्मचाऱ्यांनी १८ मृत्यु पाहिले आहेत, त्यांना मानसिक बळ देण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
कळवा रुग्णालयातील घटनेसंदर्भात शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला चौकशी समितीमधील पदाधिकारी, कळवा रुग्णालयातील डॉक्टर देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील इच्छा व्यक्त केली. पुढे बोलताना, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिले असल्याचे सांगत, येथील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी निधी आणि मनुष्यबळासाठी कशी चालना देता येईल यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने आणि ठाणेकरांना कशी मदत करता येईल हाच माझा हेतू असल्याचे त्या म्हणाल्या. बैठकीत संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतला असल्याचे सांगत, मृतांमध्ये आॅक्सिजनच प्रमाण किती होते, आय सी यु मध्ये कसली कमतरता पडली होती का?, त्यावेळी डॉक्टर किती होते याचा अंदाज घेतला आहे. या घटनेच्या अगोदर या रुग्णालयात जे रुग्ण दाखल होते जे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्या रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून आयसीयू बद्दल काही माहिती असेल तसेच रुग्णालय संदर्भात काही निरीक्षण असतील तर त्यांनी याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी असे सांगत त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील जेणे करुन लोकांचा सहभाग देखील या वस्तुस्थितीमध्ये असेल असे त्या म्हणाल्या. याची सूचना पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना केलेली असून त्यांनी ते मान्य केली असल्याचे त्यांनी सांगितले. अहवाल आमच्यासमोर सादर केल्यानंतर विधी मंडळातील सदस्य त्यावरती चर्चा करतील असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.