घरठाणेअभी तो पिक्चर बाकी है ...!

अभी तो पिक्चर बाकी है …!

Subscribe

मुंबई पाठोपाठ ठाणे महापालिकेने ही २०२१-२२ चा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर केला. दरवर्षी महासभेत अर्थसंकल्पाची चिरफाड ही होतेच. मात्र यंदा सर्वसाधारण सभेच्या पटलावर येण्यापूर्वी त्याचा ‘ट्रेलर’ स्थायी समितीच्या सभागृहात सादर करण्यापूर्वी दिसून आला. कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर येत असताना राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे ठाणे महापालिकेच्या २०२२ मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे चित्र निर्माण करण्यासाठी ठामपा अंतर्गत असलेल्या समित्यांचे अंडस्टँडिंगमध्ये वाटप केले. पण, कोरोनानंतर नगरसेवक निधी मिळत नसल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे स्थायी समिती सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, सत्ताधारी सेनेवर निशाणा धरला. त्यातच युती तुटल्यानंतर दुखावलेल्या भाजप पक्षाच्या स्थायी समिती सदस्यांनी आपली खदखद या निमित्ताने बाहेर काढून आरोप करत जोरदार फायरिंग केली. त्यातच मांडवली बादशाह हाय… हाय.. चोर कंपनी हाय.. हाय अशा घोषणा देत 455 कोटी घोटाळा उघडकीस आणला पाहिजे. तसेच यादी तयार करणारे ती दोन माणसे नेमकी कोण ? याचा पर्दाफाश करून सर्व साधारण सभागृहात हादरवून सोडण्याचा या आक्रमक झालेल्या सदस्यांनी इशारा देत अर्थसंकल्पाचा ट्रेलर दाखवत अभी तो पिचर बाकी है…असे चित्र निर्माण केले आहे.

कोरोना या आजाराच्या प्रादुर्भावानंतर कोणतीही कर वाढ अथवा दर वाढ न करणारा २७५५.३२ कोटी अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्याकडे सादर केला. हा अर्थसंकल्प वास्तववादी असून त्यामध्ये आगामी २०२२ साली होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत ठामपा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र या अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न करता, जुने प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. परंतू, हा अर्थसंकल्प महासभेत सादर करण्यापूर्वी स्थायी समितीत त्याचा ट्रेलर पाहण्यास मिळाला. आयुक्त आणि स्थायी समिती सभापती अर्थसंकल्प घेऊन सभागृहात हसमुख चेहऱ्याने आले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे काही क्षणभरच चेहऱ्यावर राहिले.आयुक्तांना अर्थसंकल्प सादर करण्यासाठी बॅगेतून बाहेर काढताच, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्यांनी थांबण्याचा इशारा दिला.काही क्षणात त्यांचा ठरल्याप्रमाणे पारा चढला. आणि तदपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा लेखाजोखा मागितला. तसेच गतवर्षातील 455 कोटींवर आणि कोरोनाचे कारण देत न मिळणाऱ्या नगरसेवक निधीवर सदस्यांनी एकमेकांना साथ लाभली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सदस्यांची आक्रमकता पाहून भाजप सदस्यांनी आलेली संधीचे सोने करून घेण्यासाठी म्यानात ठेवलेली तलवार बाहेर काढली आणि त्यांनीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांच्या जोडीने घोषणाबाजी करीत सत्ताधारी शिवसेनेला चोर म्हटले. तसेच मांडवली बादशाह हाय…हाय, अली बाबा चाळीस चोर म्हणून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. यादी कोणी केली ती दोन माणसे महापालिका चालवते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान कोरोनानंतर आणि ठामपा आयुक्त पदाची धुरा संभाळल्यानंतर अर्थसंकल्प मांडण्याची आयुक्तांची तसेच स्थायी समिती सभापतींची ही पहिलीच वेळ होती. अशाप्रकारे गोंधळ झाल्याने महापालिकेची नाचक्की होऊ नये यासाठी सदस्यांना शांत करण्याचा सभापतींनी पुरेपूर प्रयत्न केले. दुसरीकडे आयुक्तांनी गोंधळ थांबत नसल्याचे पाहून अर्थसंकल्प वाचूनही घेतला आणि अवघ्या काही क्षणात सभागृहातुन काढता पाय घेतला.

- Advertisement -

ठाणेकर नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प हा आयुक्तांनी स्थायी समितीत मांडल्यावर त्या सभागृहात चर्चा करून तो महासभेसमोर येणार आहे.पण, पहिल्यांदा अशाप्रकारे स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांना त्यांनी आपले केलेल्या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या रोखठोक भूमिकेमुळे चित्रपटापूर्वीचा ट्रेलर पाहावा लागला आहे. त्यामुळे, अर्थसंकल्प महासभेत दाखल झाल्यावर भाजपाबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिघेही सत्ताधाऱ्यांचे कशी पिसे काढणार हे पाहावे लागणार आहे. पण, २०१७ साली शिवसेनेने ५०० चौ फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नसल्याने तो मुद्दा घेऊन भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. या महिन्यात होणाऱ्या महासभेत अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आघाडीतील मित्र पक्षांना शांत बसवून शिवसेना भाजपला एकाकी पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थायी समितीत आक्रमक झालेले सदस्य सर्वसाधारण सभेत कसा स्टँड घेतात हेच पाहण्यासाठी अभी तो पिचर बाकी है असेच म्हणावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -