Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे रेल्वेत मृत्यू झालेल्या इसमाची अखेर शर्टाच्या लेबलवरून ओळख पटली

रेल्वेत मृत्यू झालेल्या इसमाची अखेर शर्टाच्या लेबलवरून ओळख पटली

Subscribe

शहरी भागात अकस्मात मृत्यूच्या घटना रोजच घडत असतात. अशा प्रत्येक घटनेचा उलगडा करणे, पीडित आणि आरोपींची ओळख पटवणे,हे पोलिसांसमोर आव्हान असते. असेच एक आव्हान डोंबिवली लोहमार्ग पोलिसांसमोर होते. रेल्वे प्रवासात अचानक एका प्रवाशाचा अकस्मात मृत्यू झाला. मात्र त्या प्रवाशाजवळ त्याची ओळख पटवणारी एकही गोष्ट नव्हती. यामुळे अज्ञात प्रवाशाची ओळख कशी पटवायची ? हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांची नजर त्या प्रवाशाच्या शर्टवर गेली आणि पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांचा शोध घेत ओळख पटवली. मेहबूब नासिर शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला जाणाऱ्या लोकलमध्ये ठाणे ते डोंबिवली दरम्यान मेहबूब शेख या प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी नेण्याआधीच त्याचा लोकलमध्येच मृत्यू झाला. मेहबूबच्या मृत्यूनंतर लोकलमधील प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मेहबूबकडे ओळख पटवण्यासाठी एकही खूण नव्हती. यामुळे त्याची ओळख कशी पटवायची ? हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता.

- Advertisement -

ओळख कशी पटवायची या विचारात असतानाच पोलिसांची पारखी नजर मेहबूबच्या शर्टवर पडली. शर्टवर फॅशन टेलर, वांगणी वेस्ट असा टॅग पोलिसांना दिसला आणि पोलिसांना आशेचा किरण दिसला. पोलिसांनी हा व्यक्ती वांगणी परिसरातील असावा, अंदाज लावून वांगणीमध्ये फॅशन टेलरचा शोध घेण्यास सुरवात केली. अखेर पोलिसांना फॅशन टेलर सापडला. पोलिसांनी त्याला मयत इसमाचा फोटो दाखवला असता तो त्याने ओळखला . सदर इसमाचे नाव मेहबूब शेख असे असून, तो वांगणीमध्ये लक्ष्मी सोसायटीत राहत असल्याचे पोलिसांना कळले.पोलिसांनी टेलरला सोबत घेऊन मेहबूबचे घर गाठले. पोलिसांनी कुटुंबीयांना रुक्मिणीबाई रुग्णालयात येऊन मयताची ओळख पटवण्यास सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन ओळख पटवल्यानंतर मृतदेह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती  वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -