स्‍टॉलधारकांमुळे मूर्तीकारांसमोर ‘विघ्‍न’ ; व्‍यावसायिकांकडील मूर्ती विक्रीविना पडून

यंदा ठाणे पालिकेकडे महिन्यापूर्वीच गणेशमूर्ती घडवण्यासाठी जागेची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोठे नुकसान झाल्याचे मूर्तीकारांनी सांगीतले आहे.

‘Disruption’ in front of sculptors due to stall holders; Idols from professionals fall without sale
स्‍टॉलधारकांमुळे मूर्तीकारांसमोर ‘विघ्‍न' ; व्‍यावसायिकांकडील मूर्ती विक्रीविना पडून

कोरोना महामरीच्या काळात फटका बसलेल्या मुर्तीकारांना अनेक अडचणींना समोर जाव लागत आहे. सरकारच्या नियमावलीमुळे आठ ते दहा फुटांपर्यंतच्‍या गणेशमूर्तीना बंदी आहे. त्याचा परिणामही व्यवसायावर झाला आहे. यातुनही मार्ग काढत असताना अजून एक नविन संकट मूर्तीकारांसमोर येऊन ठेपले आहे. गणेशमूर्ती बुक केल्यास मोफत घरपोच सेवा. गणेशमूर्तीसह आकर्षक भेटवस्तू. आणि दोन फुटापर्यंत गणेशमूर्तीच्या किंमतीत सूट. यासह अनेक आकर्षक सवलतींची खैरात सध्‍या स्‍टॉलधारकांकडून होत आहे.

 

त्यामुळे पिढीजात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडील अनेक गणेशमूर्ती गणेशमूर्ती विक्रीविना पडून आहेत. आधीच कोरोना संकट. त्‍यात सरकारची नियमावली आणि स्‍टॉलधारकांच्‍या मक्तेदारीमुळे मूळ गणेशमूर्तिकारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ठाण्यात आजच्या घडीला एक हजारच्या आसपास स्टॉलधारक आहेत. स्टॉलधारक विविध ठिकाणांहून गणेशमूर्ती खरेदी करतात. त्यानंतर मिळेल त्या किमतीत विक्री करतात. त्यामुळे कलेवर पोट असणाऱ्या मूर्तिकारांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे मूर्तीकारांसमोर एक नविन संकट उभे राहिले आहे.

हे ही पहा- ठाण्यात संजय सोनवणे यांच्या चांदोबा रे चांदोबा बालकवितासंग्रहाचे प्रकाशन; साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती  

 

या आधी मूर्तीवरील कलाकुसर पाहून त्याला किंमत देणारे भाविक होते; मात्र वाढत्या स्टॉलधारकांमुळे मूर्तीची किंमत आज केली जाते. यापूर्वी महिनाभरातच एक हजारांच्‍या आसपास गणेशमूर्ती बुकिंग होत असे. मात्र, आता फक्‍त २०० ते २५० गणेशमूर्तींचे बुकिंग झाले आहे. स्‍टॉलधारकांच्‍या वाढत्‍या संख्‍येमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे ठाणे गणेशमूर्ती संघटना, महाराष्ट्र गणेशमूर्ती संघटना आणि पेण-जोहे- हमरापूर गणेशमूर्ती संघटनांनी याप्रश्नी जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे; अन्यथा येत्या काही वर्षांत सर्वच गणेशमूर्ती व्यावसायिकांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती ज्येष्ठ मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी व्‍यक्‍त केली आहे.

 

कोरोना संकटामुळे बहुतांश ग्राहक कार्यशाळेत जाऊन गणेशमूर्ती बुकिंग करण्याचे टाळत आहे. त्यामुळे ऑनलाईन गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढतच आहे. त्यात गेल्या काही वर्षांत जागोजागी गणेशमूर्तीचे स्टॉल लागले आहेत. कमी किमतीसह आकर्षक सवलतींमुळे ग्राहकांनी मूळ गणेश व्यावसायिकांकडे पाठ फिरवली आहे. सरकारच्या नियमावलीमुळे आठ ते दहा फुटांपर्यंतच्‍या गणेशमूर्तीना बंदी आहे. त्याचा परिणामही व्यवसायावर झाला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. सरकारने ६० वर्षांपुढील मूर्तिकारांसाठी पेन्शन योजना सुरू करावी. गणेशमूर्ती घडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते.

 

अनेक मूर्तिकारांची मुले या व्यवसायात उतरत नाहीत. त्यामुळे या व्यवसायात इतर भाषकांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी मूर्तीकारांनी केली आहे. मूर्तिकारासाठी ‘जागा’ ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सरकारने गणेशमूर्तीच्या कारखान्यांसाठी भूखंड भाडेतत्त्वावर द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी केली. यंदा ठाणे पालिकेकडे महिन्यापूर्वीच गणेशमूर्ती घडवण्यासाठी जागेची मागणी केली; मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोठे नुकसान झाल्याचे त्‍यांनी सांगितले.

 

हे ही पहा- लसीकरणात भेदभाव केल्याचा आरोप; ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उधळली महासभा