छोटे मासे बळीचे बकरे, मोठे मासे मोकाट?, पक्षपाती कारवाईवरून ठाणे पोलीस दलात असंतोष

ज्या रात्री हा सर्व प्रकार मुंब्रा पोलीस ठाण्यात घडला, त्यावेळी पोलिसांबरोबरच 10 ते 15 अन्य खासगी व्यक्तीदेखील पोलीस ठाण्यात उपस्थित होत्या. त्यांनीदेखील मोबाईलमधून या सर्व घटनेचे चित्रीकरण केले असल्याची चर्चा मुंब्रा परिसरात आहे आणि त्याच्या काही व्हिडीओ तसेच ऑडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी कुणाकडे? अशी अवस्था मुंब्रा पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस कर्मचार्‍यांची झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी निलंबन कारवाई करताना पक्षपात करीत केवळ पोलीस कर्मचार्‍यांना बळीचा बकरा केल्याची भावना पोलीस दलामध्ये आहे. 6 कोटींमध्ये कोट्यवधींचे लोणी ओरपणार्‍या मोठ्या माशांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

मुंब्र्यातील एक व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी मुंब्रा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धाड घालून त्यांच्या घरातून 30 कोटींची रोकड जप्त केली होती. एवढे मोठे घबाड हाताशी लागल्यानंतर रेड घालण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हे 30 कोटी रुपये पोलीस गाडीतून मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक कडलग यांच्या दालनात आणले होते. पोलीस ठाण्यामध्ये बॉक्समध्ये आणलेली ही रोकड तब्बल अडीच ते तीन तास ठेवण्यात आली होती. मेमन यांना धमकावून एवढे पैसे तुझ्याकडे असल्याचे कळले तर तुझ्यावर धाड पडून कारवाई होईल, अशी भीती दाखवत उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना दमात घेतले. अखेरीस पोलिसांच्या दबावतंत्रापुढे नमते घेत फैजल मेमन हे 2 कोटी रुपये प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांना द्यायला तयार झाले. पोलिसांनी मात्र 2 कोटींऐवजी 30 कोटींच्या रोकडमधून तब्बल 6 कोटी रुपये परस्पर काढून घेतले आणि त्यानंतर फैजल मेमन यांना 24 कोटी रुपये परत देऊन तेथून हाकलून दिले, अशा आशयाची तक्रार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यापासून ते ठाणे पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत 24 एप्रिल रोजी करण्यात आली होती.

अखेरीस हे प्रकरण प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचल्यानंतर आणि त्याची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि सात पोलीस कर्मचारी असे मिळून 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली, तथापि ही कारवाई होत असताना या प्रकरणामध्ये ज्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत या 6 कोटींपैकी काही कोटींचे हप्ते पोहचले होते, त्यांना मात्र या कारवाईपासून वगळण्यात आल्याने ज्यांच्यासाठी कनिष्ठ पोलीस कर्मचार्‍यांनी हे सर्व प्रताप केले त्यांनाच निलंबन कारवाईला सामोरे जावे लागण्याची खंत पोलीस दलात दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.

पोलीस डायरीत बॉक्समध्ये खेळणे असल्याची नोंद
पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी धाडीला जाण्यापूर्वी तसेच धाड घालून आल्यानंतर पोलीस डायरीमध्ये या सर्व घटनेची नोंद केली आहे. त्यामध्ये त्यांनी जे बॉक्स फैजल मेमन यांच्या घरातून जप्त करून पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनात आणले होते, या बॉक्समध्ये खेळणी असल्याचे नमूद केले आहे, मात्र प्रत्यक्षात बॉक्समध्ये खेळण्याऐवजी नोटांची बंडले निघाल्याने पोलीस डायरीत खेळण्याची नोंद करणारे पोलीस निरीक्षक शेवाळे अधिकच अडचणीत आले आहेत.

सीसीटीव्ही फुटेज पाहून वरिष्ठ पोलीस अधिकारीही चक्रावले
याबाबत खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यातील त्या रात्रीच्या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण
वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे उपलब्ध आहे. ज्या रात्री हा सर्व प्रकार मुंब्रा पोलीस ठाण्यात घडला, त्यावेळी पोलिसांबरोबरच 10 ते 15 अन्य खासगी व्यक्तीदेखील पोलीस ठाण्यात उपस्थित होत्या. त्यांनीदेखील मोबाईलमधून या सर्व घटनेचे चित्रीकरण केले असल्याची चर्चा मुंब्रा परिसरात आहे आणि त्याच्या काही व्हिडीओ तसेच ऑडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओ क्लिप्सच्या धक्कादायक चित्रीकरणामुळेच पोलीस आयुक्तांना 10 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करावे लागले, असेही सांगितले जात आहे.