घरठाणेटंचाईआधीच पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा

टंचाईआधीच पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा

Subscribe

जिल्हाधिकार्‍यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

ठाणे । येणार्‍या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याविषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई जाणविण्याआधीच त्यासंबंधीच्या उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सोमवारी शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावासंबंधी बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड तसेच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता, उप अभियंता, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्च 2024 रोजीपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91 गावपाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्य:स्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्यानुषंगाने आवश्यक उपाययोजनांचे नियोजन सुरू करण्याबाबत निक्षून सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. शहापूर येथील भाऊली धरणामधून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की, त्यांनी रोजच्या रोज पाणीपुरवठा योजनांतर्गत किती काम झाले याबाबतचा प्रगती अहवाल जिल्हाधिकार्‍यांना रोजच्या रोज सादर करावा. त्याचबरोबर नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असे एकही गाव नसावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पाणीटंचाईबाबत काटेकोर नियोजन करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -