भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशन’तर्फे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्यासमवेत कल्याण येथे रविवारी सुरेल दिवाळी पहाट रंगणार आहे. सुरेश वाडकरांच्या गाण्यांबरोबरच गायिका प्रियंका बर्वे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, नृत्यांगना माधुरी पवार, ॠचला हवा येऊ द्या फेम’ कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत अनोखी व अविस्मरणीय मैफल रंगणार आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.
कल्याण शहराला सांस्कृतिक वारसा असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा व कपिल पाटील फौंडेशनकडून सात वर्षांपासून कल्याण पश्चिम येथील खडकपाडामधील साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. कोरोना कालखंडातील दोन वर्ष वगळता दिवाळी पहाट कार्यक्रमाला कल्याणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यंदाही कपिल पाटील फाऊंडेशनकडून प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांची दिवाळी पहाट होणार आहे. या वेळी धार्मिक आणि भावगीतांबरोबरच मराठी-हिंदी चित्रपटांचा नजराणा रसिकांपुढे सादर होईल. या अद्भूत आणि अद्वितीय मैफलीचा साक्षीदार होण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी बहारदार नृत्ये व हास्यअविष्कारही सादर केले जाणार आहेत.