आंबिवलीत डॉक्टरला मारहाण

clashesh between shinde group and bjp leader in kedgaon ahmednagar

धुलीवंदनाचा आनंद घेत असताना अटाळी गावातील एका तरुणाच्या पायाला काच लागली. तो उपचारासाठी आंबिवली भागातील डॉ. नितीन प्रजापती यांच्याकडे गेला. डॉक्टरांनी तरुणाला ‘तू दारु का प्यायलास’ असा प्रथमोपचार करताना प्रश्न केला. त्याचा राग येऊन दोन तरुणांनी डॉक्टरला दवाखान्याच्या बाहेर खेचून बेदम मारहाण केली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा प्रकार कैद झाला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रथमेश पाटील, नंदकुमार पाटील अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. मारहाण करणार्‍या तरुणांना तात्काळ अटक करा, अन्यथा आंबिवली परिसरातील दवाखाने बंद ठेवण्यात येतील, असा इशारा स्थानिक डॉक्टरांनी दिला आहे.
आंबिवली जवळील अटाळी गावात तरुणांचा एक गट होळीनिमित्त धुळवड खेळत होते. यावेळी एका तरुणाच्या पायाला काच लागून रक्त येऊ लागले. तो तरुण दारू प्यायला होता. तशा अवस्थेत तो उपचारासाठी याच भागातील डॉ. प्रजापती यांच्या दवाखान्या गेला. प्रथमोपचार सुरू असताना डॉक्टरांनी तरुणाला ‘तू दारु का प्यायलास’ असा प्रश्न केला. त्यावेळी तरुणाने ‘असे तुम्ही मला विचारणारे कोण,’ असा प्रश्न करुन मद्यपी तरुण आणि त्याच्या मित्राने डॉ. प्रजापती यांना दवाखान्या बाहेर खेचून बेदम मारहाण केली. काही तरुणांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

आडिवलीमध्ये हाणामारी
कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी भागात धुलीवंदनाचा कार्यक्रम सुरू असताना किरकोळ कारणावरुन तरुणांच्या एका गटाने या भागातील कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
कृष्णा राऊत असे तक्रारदाराचे नाव आहे. ते आडिवली गावात वामन बाणे चाळीत राहतात. सुनील मंडल आणि त्याचे नातेवाईक अशी आरोपींची नावे आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी धुलीवंदनाचा कार्यक्रम सुरू असताना तक्रारदार कृष्णाचे वडील शिवाजी राऊत यांनी सुनील मंडल आणि सहकार्‍यांना आमच्या घरासमोर गोंधळ घालू नका. तुम्ही तुमच्या जागेत जाऊन काय ते करा, असे सूचित केले. त्याचा राग येऊन सुनीलने शिवाजी, त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. सुनीलच्या नातेवाईकाने कृष्णाच्या डोक्यात लोखंडी कडा मारला, असे पोलिसांनी सांगितले.