घरठाणेडोंबिवली पोलीस बनले उत्तर प्रदेशात विटभट्टी कामगार

डोंबिवली पोलीस बनले उत्तर प्रदेशात विटभट्टी कामगार

Subscribe

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केले वेषांतर

तब्बल 22 गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत चोरटा राजेश राजभर याला मानपाडा पोलिसांनी वेषांतर करीत उत्तरप्रदेश मधील आजमगड येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 22 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने जप्त केले आहे. विशेष म्हणजे आरोपी राजेशला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस वेशांतर करुन वीटभट्टीवर काम केले.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्षाबंधनच्या दिवशी एका बंद घरात चोरी झाली होती. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने सोन्याचांदीचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी 30 ऑगस्ट 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, पोलीस निरिक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुनिल तारमळे, प्रशांत आंधळे, अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरु केला. त्यावेळी सराईत चोरट्याचा सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती आले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता माहिती मिळाली की, सराईत चोरट्याचे नाव राजेश राजभर असे आहे. तो आजमगड जिल्ह्यातील लालगंज तहसीलमध्ये कंजहीत रायपूर या गावात राहतो. राजेशच्या शोधात नवी मुंबई पोलिस आणि मीरा भाईंदर क्राईम ब्रांचही कामाला लागल्या होत्या. मात्र त्यांना यश आले नाही.

मानपाडा पोलीस ठाण्याचे एक पथक थेट उत्तरप्रदेश मधील आजमगड जिल्ह्यातील कंजहित रायपूर गावात पोहचले. पोलिसांना माहिती मिळाली की, राजेश राजभर हा या गावात राहतो. परंतू तो घरात नाही. त्याचे घर पाहून पोलीस हैराण झाले होते. त्याचे घर आलिशान आहे. त्याच्या बंगल्यासमोर महागड्या गाड्या उभ्या आहेत. दोन दिवस तीन पोलीस राजेशच्या शोधात होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी वेषांतर करीत दोन दिवस तेथील एका वीट भट्टीवर काम करत राहिले, मात्र त्यांची नजर गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर होती. अखेर शिकार टप्प्यात आली, आरोपी राजेश राजभर हा गावाच्या दिशेने येत असताना पोलिसांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला थांबवून त्याच्या मुसक्या आवळल्या. राजेश राजभर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत राजेश राजभर याच्या विरोधात आता पर्यंत 22 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली, शीळफाटा या परिसरातील 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 343.5 ग्राम सोन्याचे अंदाजे 21 लाख 26 हजार 600 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. एका सराईत चोरट्याला अटक करण्याची कामगिरी करणार्‍या पोलीस पथकाचे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुर्हाडे यांनी कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -