डोंबिवली । महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईल फोन संदर्भात नागरिकांच्या वारंवार तक्रारी आल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तातडीने तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. या पथकाने नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, मागील तीन महिन्यांत ५२ मोबाईल फोन परत मिळवण्यात यश मिळवले आहे. या मोबाईल फोनची एकूण किंमत ५,८८,५०० रुपये आहे. हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पोलीस शिपाई विजय कोळी यांनी सर्व तक्रारींची माहिती सी.ई.आय.आर पोर्टलवर अपडेट केली. यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईल फोनचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या सहकार्याने या मोहिमेत यश मिळाले.
हरवलेल्या मोबाईल फोनचे मूळ मालक ओळखून त्यांना हे फोन परत देण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण, अतुल झेंडे यांच्या हस्ते मोबाईल फोन मूळ मालकांना परत करण्यात आले. नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या कामगिरीत प्रमुख भूमिका निभावलेल्या अधिकार्यांमध्ये ज्ञानेश्वर साबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), विजय नाईक (पोलीस निरीक्षक, गुन्हे), सोपान नांगरे (पोलीस निरीक्षक, प्रशासन), सहपोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, पोलीस हवालदार चित्ते, पोलीस कर्मचारी कांगरे, विजय कोळी, दिपक थोरात, श्रीधर वडगावे यांचा समावेश आहे.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याने नागरिकांच्या तक्रारींवर जलद आणि प्रभावी कारवाई करत आपल्या कार्यक्षमतेचा उत्कृष्ट आदर्श सादर केला आहे. हरवलेल्या मोबाईल फोनचे परत मिळणे हे नागरिकांसाठी आनंददायक ठरले असून, पोलीस विभागावर विश्वास वाढवण्यासाठी या मोहिमेने मोलाची भूमिका बजावली आहे. पोलीस विभागाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले असून भविष्यात अशा प्रकारे अधिक तत्परतेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.