डोंबिवली । डोंबिवली विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांनी चौथ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाची घोषणा होताच डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. या विजयामुळे भाजपाने डोंबिवलीतील आपली मजबूत पकड पुन्हा सिद्ध केली आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना 1,23, 427 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांना 46,531 मते मिळाली. चव्हाण यांनी 77,000 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना चकित केले आहे. हा विजय केवळ चव्हाण यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर भाजपाच्या विचारधारेचा असल्याचे मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चव्हाण यांनी डोंबिवलीतील जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, डोंबिवली मतदारसंघाचा हा विजय ही विचारधारेची आणि जनतेच्या विश्वासाची फलश्रुती आहे. गेल्या दोन महिन्यांत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. डोंबिवली हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे आणि आज चौथ्यांदा याची सिद्धता झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून हा किल्ला आम्ही कायम राखला आहे आणि भविष्यातही तो अबाधित राहील. यासाठी मी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीतील पायाभूत सुविधा, विकासकामे, तसेच भाजपाच्या धोरणांमुळे नागरिकांमध्ये त्यांचा चांगला विश्वास आहे. विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित करत ही निवडणूक चुरशीची करण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी भाजपाला पुन्हा पाठिंबा दिला. डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते आणि मतदार यांचा विश्वास आणि मेहनत यामुळे हा विजय मिळाल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. त्यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीतील विकासकामे आणखी गती घेतील, अशी अपेक्षा आहे.