Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेDombiwali : डोंबिवलीत ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

Dombiwali : डोंबिवलीत ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

Subscribe

ठाकरेंच्या शिवसेनेचा पुढाकार

डोंबिवली । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीने एकतर्फी विजय मिळवत बहुतांश जागांवर वर्चस्व गाजवले असले, तरी महाविकास आघाडीने या यशामागे ईव्हीएम मशीनमधील फेरफार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटाने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. डोंबिवलीतील नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवत आहेत. रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार होण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळावा आणि मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता यावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली.

शिवसेना (ठाकरे गट) स्थानिक नेत्यांनी या मोहिमेसाठी विशेष कॅम्प लावले आहेत. त्यामध्ये ईव्हीएम मशीनविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक असणे गरजेचे आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटची मोजणी बंधनकारक केली जावी, असे एका स्थानिक नेत्याने सांगितले. या संदर्भात ठाकरे गटाचे नेते दीपेश यांनी जिल्हा प्रशासनाकडे १० व्हीव्हीपॅट मशीन मोजणीसाठी अर्ज केला आहे. या मोजणीसाठी ४ लाख ७२ हजार रुपयांची रक्कम भरली असून दोन आठवड्यांत मोजणीची तारीख आणि ठिकाण ठरवले जाईल, अशी माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली. मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले असून, यामुळे सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा आरोप करत, निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीपूर्वी राज्यभरात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे पक्षांमध्ये नाराजी आहे. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनच्या तपासणीसाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय भविष्यातील निवडणुकांमध्ये कागदावर आधारित मतमोजणीसारख्या पर्यायांचा विचार केला जावा, असेही सुचवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -