डोंबिवली । येथील रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २०२४ मध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलून उल्लेखनीय यश मिळवले आहे. गुन्हेगारीवर आळा बसवण्याच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक जनता समाधान व्यक्त करत आहे. पोलिसांनी ६ जबरी चोरीच्या गुन्ह्यांपैकी सर्व गुन्हे उघडकीस आणले असून, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडीच्या १४ गुन्ह्यांपैकी ०८ गुन्हे उकलण्यात यश मिळवले असून, ९,४२,७८० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. मोटार वाहन चोरीच्या ३७ गुन्ह्यांपैकी १७ गुन्ह्यांमध्ये यश मिळवून १२ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतर चोरीच्या ३१ गुन्ह्यांपैकी १५ गुन्हे उघडकीस आणत १,९९,८२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महिला अत्याचार आणि फसवणूक प्रकरणे
महिला अत्याचाराच्या २० प्रकरणांत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. फसवणुकीच्या २३ प्रकरणांपैकी १७ उकलण्यात यश मिळवून १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दुखापत आणि संघटित गुन्ह्यांवर कठोर कारवाई
दुखापतीच्या ५० प्रकरणांपैकी ४७ प्रकरणे उघडकीस आणत ५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, संघटित गुन्ह्यांवर कठोर कारवाई करत २० आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत शिक्षा देण्यात आली आहे.
अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारी घटनेवर कारवाई
दारू विक्री, मटका, अंमली पदार्थ विक्री, आणि अवैध गुटखा विक्री यासारख्या अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली. या कारवायांत एकूण १७,८२,२८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हरवलेले मोबाईल आणि साहित्य परतफेड
नागरिकांचे हरवलेले ५५ मोबाईल फोन (७,२८,००० रुपये किंमत) आणि प्रवासादरम्यान हरवलेले मौल्यवान साहित्य २२,००,००० रुपयांचे शोधून परत करण्यात आले आहे.
गुन्हेगारीत लक्षणीय घट
साल २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेत चैन स्नॅचिंग, दरोडे, घरफोडी, चोरी, फसवणूक, आणि दुखापती यांसारख्या ७० गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, यामुळे डोंबिवलीत शांतता टिकवण्यात मोठे यश मिळाले आहे.