कल्याण डोंबिवलीकरांच्या गच्चीवर पोलिसांचा तिसरा डोळा

इमारतीच्या गच्चीवर होणाऱ्या पार्ट्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे.

Drone cameras will move on the roofs of buildings during the curfew
कल्याण डोंबिवलीकरांच्या गच्चीवर पोलिसांचा तिसरा डोळा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून ५ जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असल्यामुळे यंदा थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांवर रात्री अकरानंतर बंदी आणण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी इमारतीच्या गच्चीवर नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यात येते. मात्र, या वर्षी गच्चीवरील पार्ट्यावर देखील यंदा बंदी आणण्यात आलेली आहे. इमारतीच्या गच्चीवर होणाऱ्या पार्ट्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे. ज्या इमारतीच्या गच्चीवर थर्टीफर्स्टच्या रात्रीची पार्टी करताना आढळून आल्यास सोसायटीच्या अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

ड्रोन कॅमेरातून पाहणार गच्चीवरील हालचाली

लंडन शहरासह पूर्व यरोपियन देशात नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून त्या विषाणूचा प्रसार खूप वेगाने होत असल्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून राज्य शासनाने २२ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील विविध ठिकाणी पार्ट्याचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये इमारतीच्या गच्चीचा समावेश असतो. मात्र, यंदाच्या वर्षी गच्चीवर साजऱ्या होणाऱ्या पार्ट्यावर पोलिसांची नजर असणार आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील इमारतीच्या गच्चीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी चार ड्रोन कॅमेरे तैनात केले असून या ड्रोन कॅमेरातून कल्याण डोंबिवलीतील गच्चीवरील हालचाली टिपल्या जातील.

१०० अधिकाऱ्यासह ९५० पोलीस तैनात

ज्या गच्चीवर थर्टीफर्स्टच्या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे आढळून आल्यास तेथील सोसायटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. तसेच कल्याण डोंबिवली शहरात १०० अधिकाऱ्यासह ९५० पोलीस तैनात करण्यात आले असून रात्रीची नाकाबंदीत वाढ करण्यात आली आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालणारे, विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पानसरे यांनी दिली आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून शक्य होईल, तितके घरातच राहून नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे.


हेही वाचा – बारबाला, बाटलीच्या नादी लागून व्यापारी बनला चोर