वर्षभरात ठामपाने २.६७ टन केली प्लास्टिक जप्तीची कारवाई

 सुमारे साडेचार लाखांची दंडात्मक वसुली

राज्य शासनाने पर्यावरणास घातक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर यापूर्वीच बंदी घातली असताना, ही ठाणे शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात कारवाई करत१ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत ४ हजार ७९४ आस्थापनांकडून २.६७ टन प्लास्टीक जप्त केले तर साडेचार लाखांची दंडात्मक वसुली केली आहे. अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. शहर स्वच्छतेचा ध्यास घेतलेल्या ठाणे महानगर पालिका प्रशासनाने आता प्लास्टिक मुक्त ठाणे शहरासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यात ठाणे महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध दुकानांसह हातगाड्यांची झाडाझडती घेण्यात आली.

यामध्ये पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यानुसार १ जुलैपासून संपूर्ण देशात सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी असून वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसुचनेनुसार प्लास्टिक वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकरिता दंडाची रक्कम रु पये ५०० आकारण्यात येणार आहे. तर दुकानदार, फळे व भाजी विक्रेते, व्यापाऱ्याकरीता प्रथम गुन्हा केल्यास ५ हजार, द्वितीय गुन्हा केल्यास १० हजार तर तृतीय गुन्हा केल्यास २५ हजार व ३ महिने कारावासाची शिक्षेची तरदूत करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने प्लास्टीक बंदीसाठी स्वच्छता निरीक्षकांसह उप मुख्य स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यांच्यावर प्लास्टिक मुक्त मोहीमेची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या माध्यमातून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ आतापर्यंत ४ हजार ७९४ आस्थापनांवर कारवाई करीत २.६७ टन प्लास्टीक जप्त केले असून ४ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.