महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हाच प्रश्न सातत्यां सगळ्यांना सतावत होता. मात्र, भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झालं आहे. याचं कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरी दावा सोडला आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. मात्र, नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झाला नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असा कयास बांधला जात आहे.
भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचं पूर्णपणे समर्थन असेल, असं एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कळवलं आहे. यात आमचा कोणताही अडथळा असणार नाही, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे यांनीठाण्यातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेरोशायरी करत पुढील भविष्यातील प्लॅनही सांगितला आहे.
हेही वाचा : ‘CM’पदावरील दावा सोडला, राज्यात राहणार की केंद्रात जाणार? प्रश्न विचारताच शिंदे म्हणाले, “अरे…”
शिंदे म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींना फोन करून सांगितलं, ‘सरकार बनविताना कुठलीही अडचण माझ्यामुळे होणार नाही. तुम्ही आम्हाला अडीच वर्षे संधी दिली. त्यामुळे तुमच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल.'”
“मी काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. महायुती मजबूत आहे. महायुती जेवढ्या मजबुतीनं जिंकली आहे. त्याने आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेनं आम्हाला बहुमत दिलं आहे. त्याचा आदर ठेवून अडीच वर्षे जे काम केले, त्यापेक्षा अतिशय गतीमानतेने आणखी निर्णय घ्यायचे आहेत,” असं सांगत शिंदेंनी शेरोशायरी केली.
जीवन में असली उडान अभी बाकी है….
अभी तो नापी है, सिर्फ मुठ्ठीभर जमीन…
अभी तो सारा आसमान बाकी हैं…
“आपल्याला खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचे आहे. राज्याला देशात एक नंबरचं बनवलं आहे. अन्य देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत त्यातून महाराष्ट्राला नक्की फायदा होणार आहे. भाजपचे वरिष्ठ मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा : भाजपला विधानसभेला एवढं मोठं यश कसं मिळालं? राज ठाकरेंच्या शिलेदाराचा खळबळजनक दावा