घरठाणेकोरोना आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यात ठाणे जिल्हा ठरला राज्यात अग्रेसर -...

कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यात ठाणे जिल्हा ठरला राज्यात अग्रेसर – एकनाथ शिंदे

Subscribe

राष्ट्रपती पदक विजेते पोलीस कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणारी रुग्णालये आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

कोरोना, तोक्ते चक्रीवादळ किंवा कोकणात पुरामुळे उद्देभवलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत ठाणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नियोजन भवन सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले.

गेलं वर्षभर आपण कोरोनाशी लढा देत आहोत. पहिल्या लाटेत सोयी निर्माण करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागले, रुग्णवाहिका असो, हॉस्पिटल बेडस असो किंवा अन्य सुविधा देताना प्रशासनावर मोठा ताण येत होता, तर दुसऱ्या लाटेत हा ताण अधिकच वाढला दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन निर्माण करणं, तो संपला असल्यास तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणं आणि तेही शक्य नसेल तर रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवणे हे सारं आपल्याला करावं लागलं, यावर्षी पावसाळा सुरू होताच तोक्ते चक्रीवादळ समोर आलं त्याचा सामना आपल्याला करावा लागला, आणि त्यानंतर महाड, खेड, चिपळूण येथे आलेल्या महापुरात आपल्याला पालिकेच्या माध्यमातून तिथे मदत पाठवावी लागली. ठाणे महानगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घेऊन वेळीच स्वच्छता केली नसती तर तिथे रोगराई पसरली असती मात्र तिथेही ठाणे मनपाचे अधिकारी, सफाई कर्मचारी यांनी अतिशय उत्तम कार्य केले. त्यामुळे जिथे काही उणे तिथे ठाणे असे समीकरण आता राज्यात तयार झाले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे उद्गार श्री शिंदे यांनी काढले.

- Advertisement -

शेतीच्या बाबतीत देखील जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग सुरू असून शेखर भडसावळे यांनी तयार केलेलं सगुणा राईस टेक्निक आज आपण जिल्ह्यात वापरून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळणं शक्य होत आहे. शहापूर तालुक्यात क्लस्टर शेतीच्या माध्यमातून भेंडी, भोपळी मिरची आणि दुधी यासारख्या भाज्या आज परदेशात निर्यात केल्या जात आहेत ही जिल्ह्यासाठी जमेची बाब आहे. कोरोना काळात अनेक आव्हाने येऊनही जिल्ह्यातील रस्ते, पूल, मेट्रो या कामात खंड पडणार नाही याची आपण प्रामुख्याने दक्षता घेतली. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच करत आहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

केंद्रीय पोलीस पदकासाठी पात्र ठरलेले पोलीस अधिकारी, महाड चिपळूण येथे पूरग्रस्त भागात कार्य केलेले ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, तळीये इथे मदतकार्य करून अनेक मृतदेह बाहेर काढणारे टीडीआरएफ पथक आणि कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेले डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे पोलीस आयुक्त जसजीत सिंग, ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के,आमदार संजय केळकर याशिवाय इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे यांची रानभाज्या महोत्सवाला भेट

आज स्वातंत्र्यदिनाच औचित्य साधून जिल्हा कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विशेष रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्टोल्सना श्री. शिंदे यांनी आवर्जून भेट दिली. त्यासोबतच रानभाज्यापासून तयार केलेले विविध पदार्थ देखील या महोत्सवात मांडण्यात आले होते. रानभाज्या पासून तयार केलेल्या भाज्या, कटलेट्स, सूप एवढंच काय तर पिझ्झा देखील तयार करून याठिकाणी मांडण्यात आले होते. श्री. शिंदे यांनी प्रत्येक स्टोलवर जाऊन प्रत्येक पाककृतीची कृती आवर्जून जाणून घेतली. हा रानभाज्या आणि त्यांच्या पाककृतीची ओळख करून देणारा महोत्सव हे यावेळच्या स्वातंत्र्यदिन आयोजनाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -