ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा

राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची मागणी

Pramod Hindurao

ठाणे जिल्ह्यातील राज्य शासनाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एमएमआरडीए धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या. ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यासह प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, प्रदेश सचिव प्रसाद महाजन, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत गोंधळी, प्रदेश चिटणीस प्रविण खरात, व्यापारी सेल शहर सचिव दिनेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सदलगे, रेखा सोनावणे, सुरय्या पटेल, अय्याज मौलवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर प्राधिकरण धरतीवर (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे कल्याण स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. हे प्राधिकरण झाल्यास जलद विकास करता येईल इंफ्रास्ट्रक्चर सामायिक सुविधा रस्ते, ड्रेनेज, सॉलिडवेस्ट मॅनेजमेंट, घनकचरा, दळणवळण साधन, वाहतुक व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, पार्कींग झोन, पाणी पुरवठा नियोजन आदी बाबींकडे शासनाने लक्ष घालावे. कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारने माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात तरदुत प्रस्तावित केली होती तरी त्यासाठी लागणारा 800 कोटी निधीपैकी 400 कोटींचा निम्मा निधी राज्य सरकारने उचलायचा आहे तो तत्काळ उपलब्ध करावा.

कल्याण, मुरबाड तालुक्यात महीलांसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट राज्य सरकारने सुरू करावी. त्यामुळे युवती आणि महिलांच्या हाताला काम, रोजगार संधी उपलब्ध होईल. त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, ठाणे जिल्ह्याच्या विकासाच्या उन्नतीसाठी भर घालावी. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या आरक्षित जागेवर शासकीय मेडिकल हॉस्पिटलला मान्यता द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील हुशार, होतकरू विद्यार्थ्याना वैद्यकीय शिक्षण घेणे सोयीचे होईल.

ठाणे जिल्ह्यातील विविध महापालिका नगरपरिषदा तसेच ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण परिसर याकरिता मुंबईतील बेस्टच्या प्रमाणे एकच वाहतूक प्राधिकरण असणे. मुंबई मेट्रो रेल्वे जाळे हे कल्याणपर्यत प्रस्तावित आहे. तथापि कल्याण पुढील टिटवाळा बदलापूर आणि मुरबाड या परिसरातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने कल्याण पर्यंत विस्तारित केलेले मेट्रो रेल्वेचे कार्यक्षेत्र उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर टिटवाळा आणि मुरबाडपर्यंत विस्तारण्यात यावे आदी मागण्या मुख्यमंत्र्याकडे करण्यात आल्या असल्याची माहिती प्रमोद हिंदुराव यांनी दिली.