आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्रावर मार्च महिन्यात भात खरेदी होऊनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना भाताचे पैसे दिले गेले नाहीत. यामुळे मान्सूनपूर्व शेतीची कामे करण्यास शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. या शेतकर्यांना तातडीने पैसे देण्यात यावेत आणि संबंधित दोषी अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा ३१ मे रोजी शहापूर महामंडळाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसेनेचे सुरेश पाटील यांनी दिला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांसह शेतकाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आदिवासी विकास महामंडळातील अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शहापूर तालुक्यातील दहिवली येथील शेतकर्यांनी भात खरेदी केंद्रांवर मार्च महिन्यात भात दिले आहे. मात्र तीन महीने झाले तरी या शेतकर्यांना पैसे दिले गेले नाहीत.
मान्सूनपूर्व शेतीची कामे करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. या शेतकर्याचे भात खरेदीच्या वेळी व त्यानंतरही अनेक व्यापार्यांनी केंद्रावर दिलेल्या भाताचे पैसे व्यापार्यांना महामंडळाकडून तत्काळ देण्यात आले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. भाताचे पैसे मिळण्यासाठी शेतकर्यांनी महामंडळ कार्यालयाच्या खेटे मारले. मात्र त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. तीन महिन्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे अदा केले नाहीत. वस्तुतः शेतकर्यांचे पैसे मुदतीत देण्याचे शासनाचे आदेश असतांना शहापूर महामंडळातील अधिकार्यानी पैशासाठी जाणीव पूर्वक शेतकर्यांची अडवणूक केली असल्याचा आरोप करीत या शेतकर्यांना तातडीने पैसे देण्यात यावेत, आणि संबंधित दोषी अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे सुरेश पाटील यांनी केली आहे. याबाबत आठवडाभरात कारवाई न केल्यास सोमवारी ३१ मे रोजी शहापूर महामंडळाच्या कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून संबंधित शेतकर्यांच्यासह उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे.