बहिणभावाच्या नात्याचे अतूट बंधन असलेल्या रक्षाबंधनासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभाग आता सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाला बुधवार होणारी गर्दी लक्षात घेत, नियमित गाड्यांसह ९० जादा गाड्या विशेष मार्गांवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने लांब आणि मध्यम मार्गांवर जादा गाड्यांचे नियोजन करून अपेक्षित भारमान मिळविण्यासाठी ठाणे विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. दरम्यान लालपरीतून महिला वर्गाला सवलत जाहीर झाल्यानंतरची ही पहिली रक्षाबंधन असल्याने जणू त्यांच्यासाठी सवलतीची राखी असणार आहे. यंदा २० हजार नियमित किलो मीटर पेक्षा जादा किलो मीटरचे नियोजन केले असल्याची माहिती ठाणे एसटी विभागाने दिली आहे.
नारळीपौर्णिमा तसेच रक्षाबंधन या दिवशी ठाणे विभागातील प्रत्येक आगारात दरवर्षी प्रवाशांची मोठी रेलचेल असते. रक्षाबंधन सणाचे दिवशी विभागास नेहमीच समाधानकारक भारमान प्राप्त होत असते. म्हणून गेल्या काही वर्षांचा त्या दिवशी मिळालेले भारमान लक्षात घेत, यावर्षी नियमित किलो मीटरपेक्षा २० हजार किलोमीटर अपेक्षित धरून तशी जय्यत तयारी केली आहे. गतवर्षी नियमित पेक्षा १३ हजार १५५ किमी जादा किलोमीटर झाले होते. त्यामुळे ४ लाख ५१ हजार ३४१ रुपये उत्पन्नाच्या स्वरूपात धनलक्ष्मी एसटीच्या तिजोरीत जमा झाली होती.
यावर्षीही या कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रवाशी गर्दी होणार असल्याची शक्यता असल्याने आगारांनी या दिवशी कमी भारमानातील शालेय व ग्रामीण नियते नियोजित बंद ठेवून त्याऐवजी आगाराचे चांगले भारमान असणाऱ्या मार्गावर मोठया प्रमाणात जादा वाहतुक करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या दिवशी आगारांतील एकही वाहन मार्ग बंद राहणार नाही, याची दक्षता वजा काळजी घेण्यास सांगितले आहे. याशिवाय गर्दीचा निपटारा योग्य पध्दतीने करण्यासाठी जादा वाहतुकीचे योग्य नियोजन आगार पातळीवर त्वरित करावे. तसेच या दिवशी आगार कक्षेत ज्या मार्गांवर प्रवाशी चढउतार ही मोठया प्रमाणावर असते अशा ठिकाणी प्रवाशी चढउतार करण्यासाठी, प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर करणे बंधनकारक आहे. या दिवशी आपल्या आगारातील एकही कामगिरी किंवा फेरी कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाहीत या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे.
अशा सुटणार जादा गाड्या
ठाणे १ : ठाणे-पुणे०४, ठाणे-बोरीवली ०४, ठाणे-भाईदर०३ , ०३ सातारा,०१ कोल्हापूर
ठाणे २: ठाणे-पुणे०२, ठाणे-बोरीवली ०२, ठाणे-पनवेल ०६, ठाणे-भिवंडी०३, सातारा ०१, कोल्हापूर ०१
भिवंडी: ठाणे-भिवंडी०३, भिवंडी-बोरीवली ०२, भिवंडी-कल्याण ०४, पुणे ०१ ,नगर ०१
शहापुर: कसारा-नाशिक ०३, भिवंडी-ठाणे०२, भिवंडी-कल्याण०२, शहापुर किन्हवली ०३
कल्याण: कल्याण-नगर०३, कल्याण-आळेफाटा०३, कल्याण-पनवेल ०४, कल्याण-भिवंडी ०३
मुरबाड: मुरबाड-कल्याण ०३, मुरबाड नगर ० १, मुरबाड-आळेफाटा ०३
विठ्ठलवाडी: कल्याण-भिवंडी ०३, कल्याण-पनवेल ०३, कल्याण – जव्हार ०३,आळेफाटा ०१
वाडा : वाडा-ठाणे०३, वाडा-पुणे०२, वाडा-कल्याण ०३