ठाण्यातील पंधरा बार महापालिकेने केले सील

Thane dance bar case Four including two officers of excise department suspended
ठाणे डान्स बार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांचे निलंबन

ठाण्यातील डान्स बार प्रकरण दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या चांगले अंगाशी आले असताना मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल पंधरा बार सील करण्यात आले. ठाणे महापालिकेने ही कारवाई केली असून शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर या बारना टाळे ठोकण्यात आले. त्यात स्वागत, आम्रपाली, नटराज, मैफिलपासून खुशी या बारचा समावेश आहे.

शहरात ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट (डान्स) सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना मिळताच त्यांनी याबाबत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती चार पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला.

तसेच ठाणे महापालिकेच्या संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळपासून बार सील करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानुसार, तब्बल १५ बार सील करण्यात आले आहेत. त्यात तलावपाळी येथील आम्रपाली, तीन पेट्रोल पंपवरील अँटिक पॅलेस, उपवन येथील नटराज व सुर संगम, सिने वंडर येथील आयकॉन, कापूरबावडी नाक्यावरील स्वागत व सनसिटी, नळपाडामधील नक्षत्र, पोखरण रोड नंबर २ येथील के नाईट, ओवळा नाक्यावरचा स्टार लिंग व मैफिल, वागळे इस्टेट येथील सिझर पार्क, नौपाड्यातील मनीष, मॉडेला नाका येथील अँजेल आणि भाईंदर पाडामधील खुशी या बारना टाळे ठोकण्यात आले आहे.