ठाण्यात शिवसेनेच्या शाखेवरून राडा; शिवसेना-ठाकरे कार्यकर्ते भिडले

शिवसेना विरुद्ध ठाकरे गट हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू असताना आता महाराष्ट्रात असलेल्या शिवसेनेच्या शाखा या नेमक्या कोणाच्या? यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. ठाण्याच्या शिवाईनगर येथे असलेल्या शिवसेनेच्या शाखेवरून शिवसेना आणि ठाकरे गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Fight over Shiv Sena branch in Thane

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असे बोलले जात आहे. परंतु हा वाद अद्यापही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर अद्यापही कोणतीही सुनावणी झालेली नाही. असे असताना ठाण्यामध्ये असलेल्या शिवाईनगर येथील शिवसेना शाखेवरून शिवसेना आणि ठाकरे गटांमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळत आहे. ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी शिवाईनगर येथील शिवसेनेच्या शाखेचे टाळे तोडून ही शाखा स्वतःच्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या शिवाईनगर येथे गेले 35 वर्षांपासून शिवसेनेची शाखा सुरु आहे. परंतु शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर ही शाखा बंद ठेवण्यात आलेली होती. गेल्या काही महिन्यांपासून ही शाखा पुन्हा सुरू झालेली असली तरी येथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते येऊन बसत आहेत. परंतु गेल्या काही दिवसात या शाखेचे काम सुरू असल्याने ही शाखा पुन्हा बंद ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून या शाखेला टाळे लावण्यात आलेले. परंतु आज शिवसेना (शिंदे गट) नरेश म्हस्के यांनी कार्यकर्त्यांसह या शाखेचे टाळे तोडून ही शाखा स्वतःच्या ताब्यात घेतली.

नरेश म्हस्के यांनी शिवाईनगर येथील शाखा ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, यानंतर तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी येऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या येण्यानंतर शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. तसेच या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

हेही वाचा – “बाळासाहेबांचे हिंदुत्व राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं, तेव्हा तुम्हाला…”; भाजपच्या ‘या’ नेत्याकडून उद्धव ठाकरेंचा समाचार

दरम्यान, शिवसेना ही शिंदेंचीच आहे आणि ठाकरे यांना फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास कोर्टाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच ही शाखा तीन वेळेस प्रताप सरनाईक यांच्याकडून बांधण्यात आलेली आहे. या शाखेमध्ये उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी हे येथील स्थानिक नागरिक असल्याने या शाखेवर शिंदे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा हक्क असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर गेल्या पाच वर्षात नरेश म्हस्के हे कधीही या शाखेत आले नाही, अशी माहिती ठाकरे गटाच्या शिवाईनगरच्या शाखा प्रमुखांकडून देण्यात आली आहे.