सेलिब्रेटी लसीकरण प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करा; स्थायी समिती सभापतींचे आदेश

स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी याप्रकरणी जे दोषी असतील. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असेच आदेश प्रशासनास दिले आहेत.

File charges against the culprits in the celebrity vaccination case; Orders of Standing Committee Chairpersons
सेलिब्रेटी लसीकरण प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करा; स्थायी समिती सभापतींचे आदेश

बनावट ओळखपत्र तयार करून अभिनेत्री मीरा चोप्रा हिला लस दिली. तसेच आणखी एका अभिनेत्रीच्या नावे ओळख पत्र तयार करण्यात आले. याप्रकरणाचे पडसाद शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिका स्थायी समितीत उमटले. स्थायी समिती सदस्यांनी थेट ओळखपत्र देणाऱ्या ओम साई आरोग्य केअर प्रा.लि. कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. त्यावेळी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी याप्रकरणी जे दोषी असतील. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असेच आदेश प्रशासनास दिले आहेत.लसींचा तुटवडा असल्याने राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले आहे. त्यातच ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा हॉस्पीटलमध्ये २१ जणांचे बेकायदेशीर ओळखपत्र तयार करुन तब्बल १५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणाचा गुरुवारी अहवाल चौकशी समितीने आयुक्तांना सादर केला आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत त्याचे पडसाद देखील उमटले. भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी तो मुद्दा उचलून या प्रकरणात ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. ही कंपनी दोषी आढळत असून त्यांच्याच माध्यमातून ही ओळखपत्रे देण्यात आल्याचे दिसत असल्याचे सांगितले. तसेच संबधींत ठेकेदाराची आणखीही प्रकरणे पुढे आलेली आहेत. एकीकडे १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण बंद करण्यात आले असतांना चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र देऊन अशा नागरीकांचे बेकायदेशीरपणे लसीकरण करण्याचे कामही या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे अशा ठेकेदाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी देखील दोषी असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अहवालाचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तर एकीकडे १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण बंद आहे. परंतु खाजगी संस्थांच्या माध्यमातून किंवा रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचे लसीकरण सुरु केले आहे. त्यामुळे महापालिकेने देखील पुढाकार घेऊन अशा नागरीकांचे लसीकरण सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली. तसेच आजही लसीकरणात गोंधळाची परिस्थिती असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी अशा प्रमाणात लसींचा वाटप सुरु आहे. १०० लस देत असतांना त्याठिकाणी पहिला आणि दुसरा डोसही दिला जात आहे. त्यामुळे लसींचा तुटवडा जाणवत असल्याने तो सावळा गोंधळ दुर करण्याची मागणी देखील जगदाळे यांनी यावेळी केली.