Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे मुंब्य्रातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग

मुंब्य्रातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग

४ रुग्णांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना १० लाख

Related Story

- Advertisement -

मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात बुधवारी पहाटे ३.४० वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग मीटर बॉक्सला लागली. यामध्ये रुग्ण स्थलांतरित करताना चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नॉन कोविड रुग्णालयात घडली असून रुग्णालयात २० रुग्ण दाखल होते. त्यातील सहा रुग्ण आयसीयूमध्ये होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक आमदार तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी ५ लाखांची आणि जखमींना १ लाखाची मदत जाहीर केली. तसेच ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मृत व्यक्तीना अतिरिक्त ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

बुधवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली होती. शॉटसर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यू हा आगीमुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुसर्‍या रुग्णालयामध्ये हलविण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले. तसेच प्राथमिक पाहणीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. तसेच ही आग आयसीयूमध्ये लागली नव्हती. मात्र, रुग्णांना हलवताना श्वास गुदमरून या चार जणांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. यास्मीन सय्यद (४६), नवाब शेख (४७) हलिमा सलमानी (७०) आणि हरीश सोनावणे (५७) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी धाव घेत, रुग्ण हलविण्यासाठी प्रयत्न करत त्या सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढले. ठामपा अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांनी धाव घेतली होती. यावेळी, ३ फायर इंजिन, २ टँकर आणि १ रेस्क्यू वाहन पाचारण केली होती. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच अवघ्या १० मिनिटातच गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मृतांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. प्रचंड अंधार दाटलेला असतानाही डॉ. आव्हाड यांनी जळीत रुग्णालयात प्रवेश करून मदतीचे कार्य स्वत: हाती घेतले. तर पालकमंत्र्यांनी सकाळी धाव घेत, रुग्णालयाची पाहणी करत मदत जाहीर केली.

‘ रुग्णालयातील या आगीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीच प्रत्येक रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट लवकरात- लवकर करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिलेले आहेत. तसेच ही आग नक्की कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे देखील आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिलेले आहेत. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पालिकेकडून ५ लाखांची मदत केली जाणार आहे.”
– एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री तथा ठाणे पालकमंत्री.

- Advertisement -

” पहाटेच्या सुमारास कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून एकंदर २० रुग्ण होते. त्यातील ४ जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कशामुळे आग लागली, याची चौकशी केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींनाही एक लाख रुपये दिले जातील. प्रामुख्याने ही घटना का घडली, कशी घडली? याची चौकशी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करून अभिप्राय देतील.’
– डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री तथा स्थानिक आमदार

- Advertisement -