महापालिका शाळेच्या वर्गात आग

बावीस विद्यार्थी सुखरूप

कोकणी पाडा, पोखरण रोड क्रमांक-2 येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 48 मध्ये असलेल्या एका वर्गामधील महावितरणच्या स्विच बोर्डला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी शाळेतील शिक्षकांच्या मदतीने व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचार्‍यांच्या मदतीने त्या शाळेतील 22 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

कोकणी पाडा, पोखरण रोड क्रमांक 2 येथील शिवसेना शाखेच्या बाजूला ठामपा शाळा क्रमांक 48 ही प्राथमिक शाळा असून ते पहिले ते सातवीचे वर्ग भरतात. या शाळेच्या एका वर्गामधील महावितरणच्या स्विच बोर्डला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. अशी माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत, तातडीने आगीवर नियंत्रण मिळवून त्या शाळेतील तब्बल 22 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून जवळच असलेल्या शिवसेना शाखा, येथे सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.