प्लॅस्टिक भंगार वस्तूच्या १० गाळ्यांना भीषण आग; पहाटे चारची घटना

ठाणे: ठाणे,शिळफाटा,महापे रोड ,मे. एम. जे. कंपाऊंड येथील १७ प्लॅस्टिक भंगार वस्तू असलेल्या पत्र्यांच्या गाळ्यांना आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास लागली. यामध्ये १० गाळ्यांचे नुकसान झाले असून प्लॅस्टिक भंगार वस्तूंना लागलेली आग जवळपास ५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली आहे. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मोहम्मद जावेद हकीमुल्ला चौधरी यांच्या मालकीच्या जागेमध्ये असलेल्या एम. जे. कंपाऊंड येथील १७ पत्र्याच्या गाळ्यांमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी शीळ डायघर पोलीस , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे अधिकरी-कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असून त्या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम तातडीने सुरू केले. यावेळी, २- फायर वाहन, २- रेस्क्यू वाहन, २- वॉटर टँकर, १- जम्बो वॉटर टँकर, तसेच नवी मुंबई, कोपरखैराने फायर स्टेशन चे १- फायर वाहन १- जम्बो वॉटर टँकर, जेसीबी आदी पाचारण करण्यात आले आहे.

प्लॅस्टिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश येत नव्हते. साधारणपणे ५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत त्या आगीत १० गाळ्यांचे नुकसान झाले आहे. तर या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.