घरक्राइमग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान भिवंडीत उमेदवारावर गोळीबार, तिघांना अटक!

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान भिवंडीत उमेदवारावर गोळीबार, तिघांना अटक!

Subscribe

भिवंडी ग्रामीण येथे ग्रामपंचायतीच्या धुराळा उडाला असून निवडणूक लढवण्यावरून परस्पराविरोधात वादंग सुरु झाले आहे. गेल्या आठवड्यात अशाच एका वादातून काल्हेर येथे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एका दाम्पत्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून तिघांना अटक करण्यात आली आहे, अटक करण्यात आलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांना या कामासाठी सुपारी देण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर, रेतीबंदर रोड येथे राहणारे दीपक म्हात्रे आणि त्यांची पत्नी मंगला म्हात्रे या दोघांनी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरले आहेत. ३ जानेवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे दोघे दाम्पत्य घराजवळ उभे असताना एका मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने दीपक आणि त्याची पत्नी मंगला यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडून पोबारा केला. सुदैवाने या गोळीबारात दोघांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र या प्रकारामुळे घाबलेल्या म्हात्रे दाम्पत्याने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या गुन्हे शाखे कक्ष २ च्या पथकाने विकी उर्फ सोनू प्रकाश म्हात्रे (२५) , प्रथम किशोर भोईर (२०), आणि वैभव भोकरे (२५) या तिघांना भिवंडी आणि डोंबिवली येथून अटक केली आहे.

- Advertisement -

या तिघांकडे कसून चौकशी केली असता त्यांना या कामासाठी पैसे देण्यात आले होते असे पोलिसांना समजले. मात्र ही सुपारी कोणी दिली याबाबत त्यांनी अद्याप पोलिसांना काहीही सांगितले नाही. निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्यासाठी विरोधकांनी त्यांना घाबरवण्यासाठी त्याच्यावर हल्ला घडवून आणला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत असून ही सुपारी कोणी दिली याबाबतचा उलगडा लवकरच होईल अशी माहिती पोलीसानी दिली आहे. अटक करण्यात आलेले तिघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -