घरठाणेठामपाच्या कोरस प्रसूतीगृहात प्रथमच यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

ठामपाच्या कोरस प्रसूतीगृहात प्रथमच यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रिया

Subscribe

ठाणे : ठाणे महापालिका रुग्णालयात प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आलेली महिला कोणत्याही कारणाने माघारी जाता कामा नये, अशा सूचना नुकत्याच ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकमान्य नगर येथील ठाणे महापालिकेच्या लोकमान्य टिळक कोरस प्रसूतीगृहामधील ऑपरेशन थिएटरमध्ये गुरूवारी प्रथमच दोन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य केंद्रे आणि प्रसूतीगृहांच्या समन्वयक डॉ. राणी शिंदे यांनी दिली.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध व्हावी, यासाठी विविध ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्याच अंतर्गत, लोकमान्यनगर येथील प्रसूतीगृह सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

वागळे इस्टेट विभागामध्ये येणाऱ्या लोकमान्यनगर, यशोधन नगर, इंदिरानगर, स्वा. सावरकरनगर, येऊर, शिवाईनगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर आदी विभागातील नागरिक ठामपाच्या कोरस प्रसूतीगृहात गरोदर महिलांची नाव नोंदणी करीत असतात. बहुतांशवेळा सिझेरियनची आवश्यकता असलेल्या गर्भवती महिलांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे पाठविले जात होते. मात्र त्यात बराच वेळ जात असल्यामुळे गरोदर मातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून ठामपाच्या कोरस प्रसूतीगृहात अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. गुरूवारी तिथे दोन महिलांची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून या महिला किसननगर व इंदिरानगर येथे राहणाऱ्या आहेत.

‘या’ डॉक्टरांच्या चमूने केली शस्त्रक्रिया

या सिझेरियन शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय किनरे, डॉ. वैशाली पालांडे, भूलतज्ज्ञ स्वाती खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर, सुनीता बनकर, रंजना यंदे, सीमा गाढवे, करण मोरे या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले.

- Advertisement -

प्रसूतीगृह अद्ययावत करण्याचे काम सुरू

कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दोन स्वतंत्र प्रसूती शस्त्रक्रिया कक्ष बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम विभाग, विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर काम करत आहेत. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन आठवड्यात हे दोन्ही कक्ष कार्यान्वित होतील, असे वैद्यकीय अधिक्षक अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. तसेच, कोपरी प्रसूतीगृहात आप्तकालीन सिझेरियन शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचा आढावा घेताना आयुक्त बांगर यांनी वेगवेगळ्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.


10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनो शाळा, कॉलेजात 75 टक्के उपस्थिती बंधनकारक; शिक्षण विभागाचा आदेश

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -