ठाणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हदरला आहे. विरोधक या प्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात माजी सरपंचावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे हल्लेखोरांनी माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहे. (Former Sarpanch of Ajnup Gram Panchayat Kadam Ughade was attacked and his legs were broken)
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हाच्या शहापूर तालुक्यातील कसारा भागात असलेल्या अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कदम उघडे हे काही कामानिमित्त 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता घरून एकटेच कारने जात होते. यावेळी अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायधरा गावच्या माळराना शेजारी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवत त्यावर दगडांचा मारा केला. यानंतर हल्लेखोरांनी कदम उघडे यांना कार बाहेर काढत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कदम उघडे हे गंभीर जखमी झाले.
हेही वाचा – Navi Mumbai Firing : सानपाड्यातील डी-मार्टजवळ अज्ञातांकडून गोळीबार; एक गंभीर जखमी
कदम उघडे यांच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्याने त्यांना सुरुवातीला शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी कदम उघडे यांचे पाय तुटले असल्याचे सांगितले. त्यामुळे कदम उघडे यांना कल्याण येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे. तसेच अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. मात्र कदम उघडे यांच्यावर हल्ला का झाला? कोणी केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कदम उघडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कसारा पोलीस तपास करत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गावित यांनी दिली.
हेही वाचा – Beed : बीड सरपंच हत्येप्रकरणी तीन आरोपी पाहिजेत; पोलिसांचं प्रसिद्धी पत्रक जारी