टपली मारल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याची चार विद्यार्थ्यांनीच केली हत्या

missing mother and son death body found in Drain at laldongari chembur
missing mother and son death body found in Drain at laldongari chembur

डोक्यात टपली मारल्याच्या वादातून दोन गटांत बाचाबाची सुरू असताना तो सोडविण्यासाठी गेलेल्या राजश्री शाहू महाराज विद्यालयातील तुषार साबळे (१५) या दहावी ‘ब’च्या विद्यार्थ्याची दहावी ‘अ’ च्या चार विद्यार्थ्यांनी चाकूने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट परिसरात घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पसार असलेल्या एका विद्यार्थ्याचा शोध पोलीस घेत आहेत.

वागळे इस्टेट, ज्ञानेश्वरनगर परिसरातील राजश्री शाहू महाराज विद्यालयात सोमवारी दुपारच्या सुमारास चार ते पाच जणांच्या दोन गटांमध्ये टपली मारण्यावरून वाद झाला होता. तोच वाद मंगळवारी दुपारी पुन्हा उफाळून आला असताना, त्यावेळी ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट येथे राहणारा मयत तुषार हा वाद सोडविण्यासाठी आला होता. तुषार हा दहावी ‘ब’ तुकडीतील विद्यार्थी असल्याने त्यानेच टपली मारल्याचा समज झाल्याने दहावी ‘अ’ च्या तुकडीतील एकाने तुषार याच्या छातीवर चाकूने वार केला. याचदरम्यान अन्य तिघांनी त्याला बेदम मारहाणही केली.

यामध्ये तुषार हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय मुतडक आणि उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने मुख्य सूत्रधारासह तिघांना ताब्यात घेतले असून ते १५ वर्षीय आहेत.