Thane: १५ लाखांची रोकड सापडली देवाऱ्याखाली, ठाण्यात पेट्रोल पंप लुटणारी टोळी गजाआड !

चोरी गेलेल्या २७ लाख ५० हजारांपैकी १५ लाख ९०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यापैकी एक आजी आणि एक माजी कर्मचारी आहे. तसेच या गुन्ह्याचे कोणतेही धागेदोरे नसताना अवघ्या काही दिवसात कापूरबावडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तो गुन्हा उघडकीस आणला.

ठाणे: पेट्रोलपंपावर दरोडा टाकुन तिजोरी लुटणाऱ्या सराईत पाच जणांच्या टोळीच्या सांगली,सातारा येथे जाऊन मुसक्या आवळण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले. तर त्यांच्याकडून चोरी गेलेल्या २७ लाख ५० हजारांपैकी १५ लाख ९०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यापैकी एक आजी आणि एक माजी कर्मचारी आहे. चोरी केलेली रक्कम दरोडेखोरांनी घरातील देवाऱ्याखाली जमिनीत पुरून ठेवली होती.

या गुन्ह्याचे कोणतेही धागेदोरे नसताना अवघ्या काही दिवसात कापूरबावडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तो गुन्हा उघडकीस आणला. तसेच त्या पाच जणांना ११ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ ५ चे उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली.

घोडबंदर रोड,कापुरबावडी नाक्यावरील ब्रॉडवे ऑटो मोबाईल्स एचपीसीएल पेट्रोलपंपाचे ३१ जानेवारी रोजी रात्री ०२:१५ वाजण्याच्या सुमारास ऑफीसचे दरवाज्याचे दोन्ही अॅटोमॅटीक लॉक उघडुन ऑफीसमध्ये प्रवेश केला.  ऑफीसमध्ये ठेवलेली लोखंडी तिजोरी व तिजोरीतील २७ लाख ५० हजारांची रोख रक्कम चोरी गेली होती. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यावर त्या फुटेजमध्ये चोरट्यांनी आपले चेहरे मास्क लावुन व टोपी घालुन झाकलेले तसेच त्यांनी जॅकेट घातल्याचे दिसत होते.

चोरट्यांनी नियोजनबध्द चोरी केल्याने पोलिसांना एक आव्हानच होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार केले. त्यानुसार, घटनास्थळासह इतर ३५ ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेजाचा बारकाईने अभ्यास केला. याचदरम्यान चोरी झालेल्या ऑफीसचे दरवाज्याचे दोन्ही अॅटोमॅटीक लॉक हे चावीनेच उघडले असावे या संशयावरून पेट्रोलपंपावर सध्या काम करणाऱ्या तसेच यापूर्वी काम सोडुन गेलेल्या कामगारांना पोलीस ठाण्यात आणून त्यांचा तपास केली.  त्यावेळी पेट्रोलपंपावरून सोडुन गेलेल्या कामगारांपैकी नयन पवार हा पैशाबाबत लालची व गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती पुढे  आली. फुटेजमधील चोरट्यांपैकी एकाची व नयन पवार (२०) याची शरीरयष्टी मध्ये साधर्म्य दिसुन आल्यावर तो सध्या सांगली येथून ताब्यात घेतले.

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने गुन्हयाची कबुली दिल्यावर त्याचे स्थानिक मित्र सुधाकर मोहिते(३४, सांगली), विनोद कदम (२६, सातारा) व भास्कर सावंत (२७,सांगली) आणि पेट्रोलपंपावर कामास असलेला रिलेश मांडवकर (२९,रा. ठाणे) या चौघांनाही अटक केली. तर अटकेतील सुधाकर मोहिते याने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे तसेच विनोद कदम व भास्कर सावंत हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.  त्याच्यावरही  अशाच प्रकारचे आणखी गुन्हे दाखल आहेत. तसेच विनोद हा सातारा जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, पोलीस हवालदार शरद खोडे, योगेश वाणी, विजय नाईक, पोलीस नाईक निखिल जाधव, चंद्रभान शिंदे, राजेंद्र पारथी, राजीव जाधव, सचिन काळे, अभिजीत कलगुटकर,शंकर राठोड , तुषार जयतकर, रवी रावते, पोलीस शिपाई राजाराम गारळे या पथकाने केली.

चोरीची रक्कम घरातील देवाऱ्याजवळील जमिनीत पुरली

या गुन्हयातील चोरी झालेल्या रोख रक्कमे पैकी काही रक्कम ही खर्च केली तर उर्वरित रक्कम सुरक्षित राहावी याकरीता ती विनोद कदम याचेकडे दिली होती. त्याने ती त्या घरी देवाऱ्याजवळील जमिनीत पुरून ठेवली होती. ती १५ लाख ९०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली.


हेही वाचा – मुलाच्या हव्यासा पोटी महिलेचे भयानक पाऊल, पीराने डोक्यात ठोकला खिळा